लाचप्रकरणी महापालिका लिपिक कावळेला दोन दिवसांची कोठडी
By admin | Published: July 15, 2016 09:20 PM2016-07-15T21:20:03+5:302016-07-15T21:20:03+5:30
महापालिकेतील बांधकामांच्या ठेक्यापोटी भरलेली मुदतठेव परत करण्यासाठी ठेकेदाराकडून ३३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून २० हजार रुपये स्वीकारताना सापळा रचून अटक
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 15 - महापालिकेतील बांधकामांच्या ठेक्यापोटी भरलेली मुदतठेव परत करण्यासाठी ठेकेदाराकडून ३३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून २० हजार रुपये स्वीकारताना सापळा रचून अटक करण्यात आलेले वरिष्ठ लिपिक संशयित शेखर निवृत्ती कावळे (५४) यांस एसीबी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एऩ के. ब्रह्मे यांनी शुक्रवारी (दि़ १५) दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली़. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही यामध्ये सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचा युक्तिवाद सरकारी वकील कल्पक निंबाळकर यांनी न्यायालयात केला.
महापालिकेच्या बांधकाम विभागात वरिष्ठ लिपिक असलेले व सद्यस्थितीत नाशिकरोडच्या विभागीय कार्यालयातील घरपट्टी विभागात बदली झालेले संशयित शेखर कावळे यांना गुरुवारी (दि़ १४) चार वाजेच्या सुमारास ठेकेदाराकडून २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर अटक करण्यात आली होती़ शुक्रवारी त्यांना एसीबीच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले़ यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे विशेष सरकारी वकील कल्पक निंबाळकर यांनी न्यायालयात कावळे यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली़.
सरकारी वकील निंबाळकर यांनी न्यायालयास सांगितले की, पंचनाम्यामध्ये साहेबांना दोन टक्के प्रमाणे पैसे द्यावे लागतील, असे म्हटले असून या प्रकरणात इतर अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते. तसेच सापळ्यानंतर तपासी यंत्रणेने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते नॉट रिचेबल होते़ वरिष्ठ लिपिक कावळेंची ५ मे २०१६ रोजी नाशिकरोडला बदली करण्यात आली त्याठिकाणी ते हजरही झाले; मात्र तरीही ते बांधकाम विभागातच काम कसे काय करीत होते याबाबत संबंधित विभागातील अधिकाऱ्यांकडे तपास करणे आवश्यक आहे़ महापालिकेच्या बांधकाम विभागात ठेकेदारांच्या बिलांच्या व्यवहारामध्ये कावळेंची भूमिका महत्त्वाची असून त्याचा योग्य तपास होणे गरजेचे आहे़ याबरोबरच आवाजाचे नमुने, पंचनामा, कागदावर दिलेले पैशांचे विवरण व मागणी केल्यामुळे हस्ताक्षर नमुना तसेच संशयित कावळेंच्या संपत्तीचा शोध घेण्यासाठी पोलीस कोठडी मिळावी़. सरकारी वकील व आरोपीच्या वकिलांच्या युक्तिवादानंतर न्यायाधीश ब्रह्मे यांनी संशयित शेखर कावळे यांना १७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली़.