Monsoon in Maharashtra : आनंदसरींचे आगमन! वेळेआधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 06:13 AM2021-06-06T06:13:45+5:302021-06-06T06:15:14+5:30

Two days early, monsoon arrives over Maharashtra : गेल्या वर्षी दक्षिण कोकण, कोल्हापुरात ११ जून रोजी मान्सून दाखल झाला होता.  मान्सून शनिवारी हर्णे, सोलापूर, रायचूर, तिरुपती, कुडलोरपर्यंत दाखल झाला.

Two days early, monsoon arrives over Maharashtra | Monsoon in Maharashtra : आनंदसरींचे आगमन! वेळेआधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल

Monsoon in Maharashtra : आनंदसरींचे आगमन! वेळेआधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल

Next
ठळक मुद्देगेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात इतक्या लवकर मान्सून दाखल होण्याचे हे पहिलेच वर्ष आहे.

पुणे : केरळमध्ये ३ जूनला आगमन झाल्यानंतर मान्सूनने गेल्या दोन दिवसांत वेगवान प्रवास करीत महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्रातील शाखेने जोरदार मुसंडी मारली आहे. दक्षिण कोकणातील हर्णैपासून सोलापूरपर्यंत मान्सूनचे आगमन झाले असल्याचे हवामान विभागाने शनिवारी जाहीर केले आहे. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात इतक्या लवकर मान्सून दाखल होण्याचे हे पहिलेच वर्ष आहे.

गेल्या वर्षी दक्षिण कोकण, कोल्हापुरात ११ जून रोजी मान्सून दाखल झाला होता.  मान्सून शनिवारी हर्णे, सोलापूर, रायचूर, तिरुपती, कुडलोरपर्यंत दाखल झाला. येत्या २४ तासांत मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्रातील आणखी काही भाग, कर्नाटकचा उर्वरित भाग, आंध्र प्रदेशचा आणखी काही भाग, तेलंगणा आणि तमिळनाडूचा उर्वरित भाग आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात प्रवेश करण्याच्या दृष्टीने अनुकूल वातावरण आहे़

केरळमध्ये ३ जून रोजी आगमन झाल्यानंतर मान्सूनने शुक्रवारपर्यंत कर्नाटकातील कारवारपर्यंत वेगवान वाटचाल केली होती. आज त्यात आणखी प्रगती केली असून गोव्यासह कोकणातील हर्णे तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सोलापूर व लगतच्या मराठवाड्यातील काही भागापर्यंत मजल मारली आहे. हवामान विभागाने जाहीर केलेल्या नव्या वेळांनुसार दक्षिण कोकण ७ जून, कोल्हापूर ९ जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होत असते. यंदा मात्र,‘मान्सून एक्स्प्रेस’ सुसाट सुटली आहे. तिने निर्धारित वेळेपूर्वीच महाराष्ट्रात प्रवेश केला आहे.

शनिवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत देवगड २७, सोलापूर २५, परभणी ६, चंद्रपूर ८, ब्रह्मपुरी २२, नाशिक १५, मालेगाव ४, जळगाव ३, पुणे ६, पाषाण ७ मिमी पावसाची नोंद झाली. सायंकाळी साडेपाचपर्यंत पुणे ३, लोहगाव ३४, कोल्हापूर २, नाशिक २, सांगली १, सोलापूर १, पणजी ३, डहाणू ६, अमरावती १ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

हर्णै परिसरात दोन तास पाऊस
दापोली (जि. रत्नागिरी) : हर्णै परिसरात दुपारी दीड वाजता मान्सून दाखल झाल्यानंतर तब्बल २ तास पावसाचा धिंगाणा सुरू होता. समुद्राच्या अजस्र लाटा अतिवेगाने किनाऱ्यावर येऊन धडकत आहेत़. सावंतवाडी तालुक्यात तब्बल दोन तास ढगफुटी सदृश पाऊस कोसळला. कोल्हापुरात पावसाची रिपरिप होती. साताऱ्यासह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला.

पुढील ७ दिवसात संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार

 पुणे हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यप यांनी सांगितले की, मान्सूनने आज महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या ६ जिल्ह्यांमध्ये प्रवेश केला आहे. सर्वसाधारणपणे मान्सून १५ जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापतो. यंदा तो काही दिवस अगोदर संपूर्ण महाराष्ट्रात पोहचणार आहे. 

- दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टी ते दक्षिण केरळ किनारपट्टीपर्यंत द्रोणीय क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे कोकणासह या ६ जिल्ह्यांत गेले दोन दिवस सर्वदूर पाऊस झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

मुंबई, पुण्यात २४ तासांत पाऊस? 
आज रत्नागिरी जिल्ह्यापर्यंत पाऊस झाला आहे. कुलाबा आणि सांताक्रुझ येथे पावसाचा शिडकावा झाला. येत्या २४ तासांत मुंबई, पुणे येथे चांगला पाऊस झाला तर मान्सून या भागात आला असे म्हणता येईल. या दोन दिवसात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. येत्या ४८ तासांत अपेक्षित इतका पाऊस झाला नाही तर मुंबई, पुण्यात मान्सूनच्या आगमनाला ६ ते ७ दिवस लागू शकतात.

येत्या २४ तासांत कोकण व मध्य महाराष्ट्रातील आणखी काही भागात मान्सून पुढे वाटचाल करेल, अशी शक्यता आहे.

Web Title: Two days early, monsoon arrives over Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.