दोन दिवस... बिबट्यासोबत लढाई

By admin | Published: August 25, 2016 03:31 AM2016-08-25T03:31:29+5:302016-08-25T03:31:29+5:30

वन अधिकाऱ्यांचा बंदोबस्त असूनही जीवाचा थरकाप उडालेले ग्रामस्थ असेच वातावरण या परिसरातील गावांत होते

Two days ... fighting with a leopard | दोन दिवस... बिबट्यासोबत लढाई

दोन दिवस... बिबट्यासोबत लढाई

Next

- पंकज पाटील,
मुरबाड- तालुक्यातील धसई परिसर ते पळूच्या डोंगररांगांपासून नाणेघाटच्या जंगलापर्यंत वेगवेगळ््या गावांत अन्नाच्या शोधासाठी आलेल्या बिबट्याने दोघांचा बळी घेतल्याने घाबरलेले ग्रामस्थ, शाळेत न जाणारी मुले आणि पोलिसांचा, वन अधिकाऱ्यांचा बंदोबस्त असूनही जीवाचा थरकाप उडालेले ग्रामस्थ असेच वातावरण या परिसरातील गावांत होते. संध्याकाळ झाली की कोणत्याही क्षणी बिबट्या येईल, या भीतीपोटी चिडीचूप होणारी घरे, त्याच्या नुसत्या चाहुलीने गपगार पडणारी जनावरे असे काळजाचा थरकाप उडवणारे चित्र या गावांत होते. जगण्यासाठी माणसासोबत सुरू असलेल्या लढाईत बिबट्या हरला... माणूस जिंकला. गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. तो ठार झाला, पण त्याच्या जगण्याचे अनेक प्रश्न तसेच ठेवून गेला.
धसईपासून पाच किमी अंतरावर असलेल्या पळू-सिंगापूर, सोनावळे आणि रामपूर-मढ गावांच्या हद्दीत बिबट्याचा वावर वाढल्याच्या बातम्या महिनाभर येत होत्या. आधी पळू येथे एका वृध्देचा जीव घेतल्यानंतर लागलीचा दोन दिवसात सोनावळे येथे बिबट्याने एका शेतकऱ्याचा जीव घेतला. वेगवेगळे हल्ले झाल्याने एकीकडे भीती, दहशत आणि दुसरीकडे प्राण्यासोबत जगण्याची लढाई असे वातावरण या गावात तयार झाले होते. त्याच्या पावलांचा माग काढला जात होता. सीसीटीव्हीत कैद झालेल्या त्याच्या छबीत दिसणारे चमकदार डोळे आणि अन्नासाठी वाट्टेल तो संघर्ष करण्याची त्याची धडपड बुधवारी रात्री संपली.
बिबट्या नरभक्षक बनल्याने त्याला ठार मारण्याचे आदेश आले आणि पोलीस, जिल्हाभरातील वन अधिकाऱ्यांचा फौजफाटा गावागावांत तैनात झाला. ज्या दोन गावांत हल्ले झाले, तेथे पोलीस बंदोबस्त होता. टोकावडे परिसर हे या लढाईचे केंद्र बनला. १५ अधिकाऱ्यांसह १०० हून अधिक वन कर्मचारी बिबट्याच्या बंदोबस्तासाठी तैनात होते. बिबट्याने हल्ला केलेल्या ठिकाणांसह तीन ठिकाणी पिंजरे लावण्यात आले. पण त्या पिंजऱ्यांची अवस्था आणि त्यासाठी लावलेले आमिष इतके दयनीय होते, की त्यात बिबट्या अडकण्याची शक्यता कमीच होती.
ज्या सोनावळे गावात शेतकऱ्याला बिबट्याने मारले, त्या गावाची पाहणी केली तेव्हा त्या गावाच्या वेशीवरच पोलिसांचा मोठा फौजफाटा पाहायला मिळाला. पोलिसांसोबत वन विभागाचे कर्मचारीही शाळेच्या आडोश्याला उभे होते. गावात प्रवेश केला, तेव्हाही नाक्यावर दोन पोलीस तैनात दिसले. बिबट्याचा हल्ला हा सायंकाळनंतर होण्याची शक्यता असल्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी दुपारी जिल्हा वन अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेत त्याच्या सवयी, त्याने आधी केलेले हल्ले, त्याचा वावर, त्याच्या व्पावलांचे ठसे यांचा अभ्यास केला. त्याला बेशुद्ध करायचे की मारायचे यावर चर्चा झाली. बिबट्याला मारण्यासाठी ग्रामीण पोलीसांचे खास नेमबाज शिपाई बोलावण्यात आले. पळू ते रामपूर या गावांच्या परिसरात सात ठिकाणी वन विभाग आणि पोलिसांनी सापळा लावला. बंदुकधारी शुटरच्या माध्यमातून बिबट्याचा शोध सुरु झाला. गावकरी इतके अस्वस्थ झाले होते की पोलीस आणि वन विभागाचे कर्मचारी नियोजित चौकीवरच तळ असल्याने त्यांचा संयम संपू लागला. तुम्ही नेम धरून बसलाय तिथे बिबट्या येईल कशावरून, असा सवाल त्यांनी केल्याने मग पाच पथके वेगवेगळ््या गावांत तैनात करण्यात आली. पण बिबट्या नजरेस पडत नव्हता.
ही मोहीम आखली जात असतानाच मंगळवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास रामपूर गावात तानाजी शेळकंदे यांनी घराच्या मागच्या बाजुला बिबट्याला पाहिले. त्याने कोंबडी मारल्यावर तानाजी यांनी त्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला. पण बिबट्या तेथून पसार झाला. मग त्याचा माग काढत, पावलाचे ठसे शोधत रामपूर गावातून त्याचा पाठलाग सुरू झाला. बिबट्या बाहेर पडताच या गावाला लागुन असलेल्या पढ पाड्यावर शेतात बसलेला दिसला. लागलीच शेतकऱ्यांनी चोहो बाजुंनी त्याला घेरण्याचा प्रयत्न केला. त्याला अडवण्याचे प्रयत्न सुरू झाले. साधारण वीस मिनिटे ही लढाई सुरू होती. गावातील चार जंगली कुत्री त्याच्या अंगावर सोडण्यात आली. त्यांची झपापट झाली. बिबट्याच्या डरकाळ््या आणि कुत्र्यांच्या भुंकण्याने परिसर दणाणून गेला. कुत्र्यांनी बिबट्याला चावे घेतले. ही झुंज जवळपास दहा मिनिटे सुरू होती. याच दरम्यान पांडू वाघ या शेतकऱ्याने दांडके घेत बिबट्यावर हल्ला केला. मात्र तो निकराने परतून लावत जिवाच्या आकांताने बिबट्याने तेथून पळ काढला. बिबट्या आणि ग्रामस्थांमधील हा संघर्ष संपल्यावर अवघ्या दहा मिनिटांतच वन विभागाचे अधिकारी तेथे पाचले. त्यानंतर पुन्हा त्याच्या मागावर माणसे निघाली. पण तो सापडला नाही. रात्र तशीच वाट पाहण्यात गेली. पुन्हा हा बिबट्या रामपूर गावाजवळ येईल अशी शक्यता असल्याने वन विभागाने तीन बंदुकांसह पाच कर्मचाऱ्यांना या गावात रात्रभर तैनात केले. बिबट्याची शिकार करता यावी, यासाठी आमिष म्हणून तीन कोंबड्या बांधण्यात आल्या. पण बिबट्या या ठिकाणी फिरकलाच नाही. पुन्हा बुधवार तसा दहशतीतच गेला. संध्याकाळी तो गावात येईल, अशी अटकळ होती. त्यामुळे पाच ठिकणे हेरून त्याला मारण्यासाठी डोळ््यात तेल घालून पहारा सुरू होता. तो आला. सोनावळे गावात दिसला... नरभक्षक असल्याने त्याला गोळ््या घालून ठार करण्यात आले. बिबट्या त्याच्या जगण्याची लढाई हरला...
>रात्रीनंतर घरे कुलूपबंद : बिबट्याने दोन ग्रामस्थांचा जीव घेतल्याने मढ, मढ पाडा, रामपूर, सोनावळे, पळू-सिंगापूर या परिसरात सर्वाधिक दहशतीचे वातावरण आहे. सर्वात शेवटी या बिबट्याचे दर्शन रामपूर गावात झाले. त्यामुळे वन विभागाने या परिसरात सापळा लावला. बिबट्या कधीही हल्ला करेल म्हणून ग्रामस्थांनी आपल्या मुलांना घरातच बंद करून ठेवले. तसेच रात्री आठनंतर प्रत्येक घराचे दार बंद करुन सर्वांनी घरातच शांत बसणे पसंत केले. बिबट्या थेट गावात शिरुन शिकार करीत असल्याने ग्रामस्थांनी पोलीस बंदोबस्त वाढवून घेतला. तो बंदोबस्तही आडोशाच्या आधारे होता. पण रामपूर गावात पोलीस बंदोबस्त नसल्याने इतर ग्रामस्थांनी नाराजीच व्यक्त केली होती.

Web Title: Two days ... fighting with a leopard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.