दोन दिवस मुंबईसह कोकणात मुसळधार, हवामान विभागाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 02:44 AM2020-07-14T02:44:49+5:302020-07-14T02:45:24+5:30
गेल्या दोन दिवसांपासून मुंबई शहर, उपनगरात चांगला पाऊस पडत आहे. विशेषत: रात्रीच्या वेळेला दाखल होणारा पाऊस मुंबईला झोडपून काढत आहे.
मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने ‘पुनश्च हरिओम’ केले आहे. रविवारसह सोमवारी मुंबई शहर, उपनगरात तुरळक ठिकाणी विश्रांती घेत अन्य ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर आता मंगळवारसह बुधवारी मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे. १४, १५ आणि १६ जुलै रोजी महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर सोसाट्याचा वारा वाहेल, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.
- गेल्या दोन दिवसांपासून मुंबई शहर, उपनगरात चांगला पाऊस पडत आहे. विशेषत: रात्रीच्या वेळेला दाखल होणारा पाऊस मुंबईला झोडपून काढत आहे.
- सोमवारी सकाळी ११ वाजता तसेच दुपारी ४ वाजता मुंबईत तुरळक ठिकाणी मोठ्या सरी कोसळल्या. सोमवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत दक्षिण मुंबईत २०, तर मध्य मुंबईत ४० मिलीमीटरहून अधिक पाऊस पडला. पूर्व आणि पश्चिम उपनगरात २० ते ४० मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली. नरिमन पॉइंट, भायखळा, वरळी, माहीम, कुर्ला, बीकेसी, बोरीवली, कांदिवली, पवईसह लगतच्या परिसराचा यात समावेश आहे.
मेघगर्जनेसह विजा कडाडणार
१४ जुलै : कोकण, गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल.
१५ जुलै : कोकण, गोव्यात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. विदर्भात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल.
१६ जुलै : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
१७ जुलै : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.