वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता दोन अधिष्ठाता

By admin | Published: August 7, 2014 08:42 PM2014-08-07T20:42:08+5:302014-08-07T22:59:38+5:30

सूचना व मते मागवली : प्रशासकीय आणि शैक्षणिक जबाबदारीचे होणार विभाजन

Two deacons now in medical colleges | वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता दोन अधिष्ठाता

वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता दोन अधिष्ठाता

Next

अकोला: राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांचे शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाज विभागण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन आहे. आतापर्यंत ही दोन्ही कामे एकाच अधिष्ठात्याच्या खांद्यावर असायची. आता या कामांची विभागणी करून सर्व वैद्यकीय महाविद्यालर्यांमध्ये दोन अधिष्ठात्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय वैद्यकीय शैक्षणिक विभागाने घेतला आहे. त्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठातांकडून त्यांच्या सूचना व मते मागविण्यात आली आहेत.
राज्यात एकूण १४ शासकीय व ३९ खासगी वैद्यकीय महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांच्या अधिष्ठातांना महाविद्यालयातील शिक्षण, प्रशासन, कर्मचार्‍यांची ड्युटी तसेच रूग्णालयातील रूग्णांच्या समस्या आदी जबाबदार्‍या सांभाळाव्या लागतात.
एकाच व्यक्तीकडे अनेक जबाबदार्‍या असल्यामुळे ते कामाला योग्य न्याय देऊ शकत नाही. परिणामी शैक्षणिक कामासोबतच प्रशासकीय कामातही अडचणी निर्माण होत असल्याचे आढळून आले आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ही बाब गांभीर्याने घेतली आहे. वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी अधिकाधिक सोयीसुविधा निर्माण करणार असल्याचे सुतोवाचही त्यांनी मध्यंतरी केले होते. त्या पार्श्‍वभूमिवर वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये दोन अधिष्ठाता नेमण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.
या प्रस्तावाला अंतिम स्वरूप देण्यासाठी सर्व अधिष्ठातांकडून मते व सूचना मागविण्यात येत आहेत. सध्या कार्यरत असलेल्या अधिष्ठातांकडे शैक्षणिक जबाबदारी कायम ठेऊन, प्रशासकीय जबाबदारीसाठी नवीन अधिष्ठातांची नियुक्ती केली जाणार आहे.
प्रशासकीय कामांचा अनुभव असलेल्या व्यक्तींची या पदावर नियुक्ती केली जाणार असल्याने, वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासन आणि संलग्न रुग्णालयाच्या प्रशासनाचा दर्जा सुधारण्यास मदत होईल.

** प्रशासकीय सेवेतील अधिकारी उपअधिष्ठाता पदासाठी अनुत्सुक
मुंबईतील जे.जे.सारख्या मोठय़ा रूग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिष्ठातांसोबतच उपअधिष्ठाता हे पदसुद्धा निर्माण करण्यात आले आहे. या पदावर प्रशासकीय सेवेतील तहसिलदार किंवा उपविभागीय अधिकारी दर्जाच्या अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात येते; मात्र त्यांना कोणतेच विशेषाधिकार नसल्याने अधिकारी या पदावर काम करण्यास इच्छुक नसतात. नियुक्तीनंतर काही अधिकारी सुटीवर जाऊन बदलीसाठी प्रयत्न करतात. त्यामुळे ही पदे बहुतेकदा रिक्तच राहत असल्याचा अनुभव आहे.

Web Title: Two deacons now in medical colleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.