दोन डॉक्टरांची वीज चोरी पकडली
By admin | Published: December 27, 2016 02:25 AM2016-12-27T02:25:08+5:302016-12-27T02:25:08+5:30
वाशिम येथे कारवाई ; ६.६३ लाख रुपये दंड वसूल!
वाशिम, दि. २६-वीज चोरांवर धडक कारवाई, या मोहिमेंतर्गत महावितरणने शहरातील दोन डॉक्टरांवर धडक कारवाई करीत ६ लाख ६३ हजार १३0 रुपयांचा दंड वसूल केला, अशी माहिती अधीक्षक अभियंता डी.आर. बनसोडे यांनी सोमवार, २६ डिसेंबर रोजी दिली.
यासंदर्भात अधिक माहिती देताना बनसोडे म्हणाले, की महावितरणच्यावतीने वीज चोरी आणि गळतीचे प्रमाण कमी करण्यासंदर्भात सर्वंंकष प्रयत्न केले जात आहेत. यादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीवरून भरारी पथकाने वाशिम शहरातील डॉ. नितीन ढोबळे यांच्या घरगुती कनेक्शनची तपासणी केली असता, वीज चोरी सुरू असल्याचे उघड झाले. त्यामुळे त्यांना घरगुती कनेक्शनपोटी ७९ हजार १८0 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच त्यांच्या हॉस्पिटलमधील कनेक्शनच्या तपासणीदरम्यानही वीज चोरीचा प्रकार आढळल्याने २ लाख ५५ हजार ९४0 रुपये दंड करण्यात आला. दुसर्या कारवाईत डॉ. नारायण डाळे यांच्या घरगुती कनेक्शनच्या तपासणीदरम्यानही गंभीर प्रकार आढळल्याने घरगुती कनेक्शनपोटी १ लाख ३८ हजार ४७0 आणि पॅथॉलॉजीमधील कनेक्शनपोटी १ लाख ८९ हजार ५४0 रुपये, असा एकूण ३ लाख २८ हजार १0 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
या कारवाईत अतिरिक्त कार्यकारी अभियंता फुलझेले, सहायक अभियंता रवींद्र व्यवहारे, प्रभारी कार्यकारी अभियंता पी. के चव्हाण यांनी सहभाग घेतला.