सख्ख्या भावांसाठी दोन डमींनी दिली परीक्षा
By admin | Published: April 16, 2016 02:12 AM2016-04-16T02:12:16+5:302016-04-16T02:12:16+5:30
रत्नागिरीत झालेल्या पोलीस भरतीसाठीच्या लेखी परीक्षेत दोन सख्ख्या भावांसाठी दोन डमी उमेदवारांनी लेखी परीक्षा दिल्याचे उघड झाले आहे. डमी म्हणून बसलेल्या दोघांसह एकूण सात
रत्नागिरी : रत्नागिरीत झालेल्या पोलीस भरतीसाठीच्या लेखी परीक्षेत दोन सख्ख्या भावांसाठी दोन डमी उमेदवारांनी लेखी परीक्षा दिल्याचे उघड झाले आहे. डमी म्हणून बसलेल्या दोघांसह एकूण सात जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली असून, त्यांना १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या सात जणांमध्ये औरंगाबाद येथील
एका पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या सात जणांमध्ये डमी उमेदवार म्हणून लेखी परीक्षा देणारे विठ्ठल त्र्यंबक शिसोदे ऊर्फ माऊली (वय २१) व पवण सांडू कवाळे (२१, दोघेही रा. निहालसिंगवाडी, पो. रोहिलागड, ता. अंबड, जि. जालना), शारीरिक चाचणीत उत्तीर्ण झालेले (ज्यांनी लेखी परीक्षा देणे अपेक्षित होते ते) उमेदवार विशाल अशोक शिंदे (२५) व उमेश अशोक शिंदे (२१, दोघेही रा. सागवण, उल्हास चौक, जिल्हा बुलडाणा) व या गुन्ह्यास सहकार्य करणारे विनोद रामसिंग माळी (३२, रा. वाळुंज-औरंगाबाद), नवनाथ गंगाधर चव्हाण, (२८, रा. भडगाव, ता. खुलताबाद, जि. औरंगाबाद) व पोलीस कॉन्स्टेबल पूनमसिंग हरसिंग सुंदरडे (२९, रा. पोलीस मुख्यालय, औरंगाबाद, मूळ रा. अंबड, जालना) यांचा समावेश आहे. जिल्हा पोलीस मुख्यालयातर्फे रत्नागिरी येथे लेखी चाचणी घेतली. (प्रतिनिधी)