ठाणे पोस्टातील दोन वृद्ध झाडूवालींना मिळाले निवृत्तिवेतन
By admin | Published: April 13, 2017 12:59 AM2017-04-13T00:59:21+5:302017-04-13T00:59:21+5:30
पोस्टल स्टोअर्स डिपार्टमेंटच्या ठाणे शहरातील दोन कार्यालयांमध्ये २५ वर्षांहून अधिक काळ हंगामी सफाई कर्मचारी म्हणून काम करून आता वयाची सत्तरी पार केलेल्या
मुंबई : पोस्टल स्टोअर्स डिपार्टमेंटच्या ठाणे शहरातील दोन कार्यालयांमध्ये २५ वर्षांहून अधिक काळ हंगामी सफाई कर्मचारी म्हणून काम करून आता वयाची सत्तरी पार केलेल्या दोन महिलांना तीन महिन्यांत रीतसर पेन्शन देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिला.
न्या. आर. एम. बोर्डे आणि न्या. अजय गडकरी यांनी दिलेल्या या निकालाने शांताबाई जी. नाईक आणि सीताबाई आर. मोरे या दोघींना न्याय मिळाला आहे. मुंबईत सातरस्ता येथील रसूल जिवास चाळीत राहणाऱ्या शांताबाई आज ७६ वर्षांच्या आहेत. तर, आंबेडकर नगर, कसारा येथील सीताबाई ७१ वर्षांच्या आहेत. निवृत्तीचे ६० वर्षे हे नियत वय उलटून अनुक्रमे १६ व ११ वर्षे झाल्यानंतर त्यांना न्याय मिळाला आहे. दोघी टपाल खात्यात ‘ग्रुप डी’ कर्मचारी म्हणून नियमित नोकरीत होत्या, असे मानून नेमणुकीच्या दिवसापासून ते निवृत्तीच्या तारखेपर्यंत सेवाकाळ गृहीत धरून पेन्शनचा नियमानुसार हिशेब करावा व ते तीन महिन्यांत सुरू करावे, असा आदेश न्यायालयाने दिला.
शांताबाई आणि सीताबाई टपाल खात्याच्या दोन कार्यालयांमध्ये झाडलोट करणे, पाणी भरून ठेवणे व स्वच्छतागृहे स्वच्छ करणे अशी कामे सकाळी तीन तास व संध्याकाळी तीन तास करत असत. वयाची साठी उलटून गेल्यावरही हे काम त्यांनी केले. तरीही त्यांना हंगामी नोकरीत ठेवले.
याविरुद्ध दोघींनी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (कॅट) दाद मागितली. तेव्हा त्यांना पेन्शन द्यावी, असा आदेश न्यायाधिकरणाने दिला. याविरुद्ध टपाल खात्याने केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. दोघींची नेमणूक हंगामी म्हणून केली गेली होती व त्या दररोज दोन-तीन तास काम करत होत्या या टपाल खात्याच्या म्हणण्यास पुरावा नाही. सरकारने आदर्श ‘एम्प्लॉयर’ म्हणून वर्तन करणे अपेक्षित आहे. कर्मचाऱ्यांच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन सरकार त्यांची पिळवणूक करू शकत नाही, असे खंडपीठाने सुनावले.
टपाल खात्यासाठी अॅड. नीता मसूरकर व अॅड. एन. आर. प्रजापती यांनी तर, अॅड. अंजली हेलेकर यांनी ‘अमायकस क्युरी’ म्हणून काम पाहिले. (विशेष प्रतिनिधी)