महिला स्वच्छतागृहात मोबाईलवर चित्रीकरण केल्याप्रकरणी दोन कर्मचारी निलंबित
By admin | Published: July 12, 2016 06:22 PM2016-07-12T18:22:30+5:302016-07-12T18:22:30+5:30
महिला स्वच्छतागृहात मोबाईलवर चित्रीकरण केल्या प्रकरणी दोन कर्मचा-यांवर मंगळवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली.
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 12 - स्वारगेट येथील पीएमपीच्या मुख्य इमारतीतील महिला स्वच्छतागृहात मोबाईलवर चित्रीकरण केल्याप्रकरणी दोन कर्मचा-यांवर मंगळवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली. सोमवारी ( दि,12) सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला होता. दरम्यान, या कर्मचा-यांमधील एक कर्मचारी पीएमपीचा क्लीनर असून दुसरा कर्मचारी शिकाऊ संगणक आॅपरेटर म्हणून काम करत आहे. यातील पीएमपीच्या कर्मचा-याची विभागीय चौकशी केली जाणार असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले. या बाबतचे वृत्त सर्वप्रथम लोकमतने दिले होते. त्याची गंभीर दखल घेत ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी स्वारगेट पोलीसांनीही आज दुपारी पीएमपी कार्यालयात जाऊन चौकशी केली. त्यानंतरही या ठिकाणी काम करणा-या महिलांमध्ये भितीचे वातावरण असल्याचे दिसून आले.
स्वारगेट येथील पीएमपीच्या मुख्य इमारतीमधील पहिल्या मजल्यावर महिला आणि पुरुषांसाठी शेजारी-शेजारी स्वच्छतागृह आहे. दोन्ही स्वच्छतागृहामध्ये केवळ पार्टिशन आहे. तेथील एक महिला कमर्चारी स्वच्छतागृहात गेल्या असताना त्यांना पार्टिशनमधून एका गुलाबी रंगाच्या मोबाईलवर चित्रीकरण केले जात असल्याचे आढळले.त्यानंतर संबधित आरडाओरडा करुन शिपायाला बोलावण्यास त्या गेल्या. तेवढया वेळेत कोणीतरी तो मोबाईल काढून घेऊन गेल्याचे आढळून आले. त्यावेळी तेथून जाणा-या ा दोघांवर या महिला कमचा-र्यांनी संशय व्यक्त केला होता. तसेच अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांकडे कारवाई करण्याबाबत लेखी तक्रारही दिली होती. त्यानुसार, पीएमपीचा अतिरिक्त पदभार असलेले महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी या प्रकरणाची माहिती घेऊन दोन कर्मचा-यांना निलंबित केले आहे. तसेच त्यांची खातेनिहाय चौकशी करण़्याचे आदेश दिले असल्याचे प्रभारी सह व्यवस्थापकीय संचालक सुषमा कोल्हे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
पुरुषांचे स्वच्छतागृह कायमस्वरूपी बंद
या प्रकरणानंतर मंगळवारी सकाळी तातडीने या ठिकाणी असलेले पुरूषांचे स्वच्छतागृह पीएमपी प्रशासनाकडून बंद करण़्यात आले आहे. या स्वच्छतागृहाच्या दरवाजालाच फ्लायवूड ठोकण्यात आला असून या पुढे हे स्वच्छतागृह केवळ महिलांसाठी असणार असल्याचे कोल्हे यांनी स्पष्ट केले. या शिवाय संपूर्ण इमारतीच्या सुरक्षीततेसाठी या पूर्वी सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यासाठीच्या प्रस्तावाची माहिती घेण्यात येणार असून महिलांच्या सुरक्षेसाठी सर्व उपाय योजना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या शिवाय लवकरच प्रत्येक मजल्यावर महिलांसाठी चांगल्या स्वरूपाची स्वच्छतागृहे उभारण्यासाठी उपाय योजनाही केल्या जाणार असल्याचे त्या म्हणाल्या.