बुलडाणा जिल्ह्यात दोन शेतक-यांची आत्महत्या
By admin | Published: July 23, 2016 01:59 AM2016-07-23T01:59:53+5:302016-07-23T02:02:23+5:30
सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे व्यथित होऊन जिल्ह्यातील दोन शेतक-यांनी २२ जुलै रोजी मृत्यूस कवटाळले.
बुलडाणा: सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे व्यथित होऊन जिल्ह्यातील दोन शेतकर्यांनी २२ जुलै रोजी मृत्यूस कवटाळले. मोताळा तालुक्यातील महालपिंप्री येथील राजेंद्र पुंडलीक गारमोडे (वय ३८) या शेतकर्याने राहत्या घरात शनिवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. राजेद्र गारमोडे यांच्याकडे पाच एकर कोरडवाहू शेती असून त्यांच्यावर बँकेचे जवळपास साडेतीन लाख रुपये कर्ज होते. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा व आई-वडील असा आप्त परिवार आहे. दुसर्या घटनेत बुलडाणा तालुक्यातील चांडोळ येथील काशिराम किसन शिंदे (वय ६0) या शेतकर्याने २२ जुलै रोजी दुपारी विषारी औषध प्राशन केले. त्यामुळे अत्यावस्थेत त्यांना बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृतक काशिराम शिंदे यांच्यावर महाराष्ट्र बँकसह इतर बँकाचे जवळपास ५0 हजारांचे कर्ज होते. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, १ मुलगी असा आप्त परिवार आहे.