दोन मच्छीमार नौका बुडाल्या
By admin | Published: August 23, 2016 03:06 AM2016-08-23T03:06:11+5:302016-08-23T03:06:11+5:30
दोन मच्छिमार बोटी एकमेकांवर आदळल्याने त्यांना समुद्रात जलसमाधी मिळाल्याची घटना २१ आॅगस्ट रोजी रविवारच्या मध्यरात्री घडली.
अनिरुद्ध पाटील,
डहाणू/बोर्डी- तलासरी तालुक्यातील झाई गावच्या दोन मच्छिमार बोटी एकमेकांवर आदळल्याने त्यांना समुद्रात जलसमाधी मिळाल्याची घटना २१ आॅगस्ट रोजी रविवारच्या मध्यरात्री घडली. अपघातग्रस्त दोन्ही बोटीतील एकूण पंधरा खलाशांनी सुरक्षा यंत्रणेशी संपर्क साधला. मात्र मदत न मिळाल्याने अखेर शर्थीचे प्रयत्न करून त्यांनी किनारा गाठला. दरम्यान सुरक्षा यंत्रणे विरूद्ध मच्छिमारांनी तीव्र संपता व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र गुजरात सीमेवरील तलासरी तालुक्यातील झाई गावातील हस्तसागर बोट २१ आॅगस्ट रोजी दुपारी चार वाजता मासेमारीसाठी समुद्रात निघाली होती. मात्र किनाऱ्यापासून पाच किमी अंतरावर ती खडकावर आदळून अपघातग्रस्त झाली. या वेळी बोटीत नऊ खलाशांनी सायंकाळी सातच्या सुमारास मोबाईल फोनच्या साह्याने तटरक्षक दलाच्या १०९३ हेल्पलाईनवर अपघाताची माहिती देवून मदत मागितली. तसेच बंदरावरील स्थानिक मच्छिमारांनाही याबाबत कळविले. कृष्णसागर कृपा ही बोट मदतीला आली. मात्र अपघातग्रस्त बोटीला किनाऱ्याकडे घेऊन जात असतांना जोराचा वारा व लाटांच्या तडाख्यात सापडून दगडावर आपटल्याने कृष्णसागर बोटीत पाणी भरले. आपत्कालीन परिस्थितीत मदत यंत्रणेकडे धोक्याचा संकेत पाठविणारे बोटीवरील डॅट यंत्रही कुचकामी ठरले. रात्री नऊच्या सुमारास घोलवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दुर्गेश शेलार यांनी अपघातग्रस्त बोटीवरील सूरज माच्छी या खलाशाशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेऊन मदत पाठवीत असल्याचे सांगितले. मदत न आल्याने मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास दोन्ही बोटी बुडत असल्याने जीव वाचविण्यासाठी सर्व खलाशी हे पाण्यात उड्या टाकत असल्याचे सूरजने शेलार यांना कळविले. त्यानंतर बांबू व बोयाचा तराफा बनवून जीव वाचविण्यासाठी खलाशांचा प्रयत्न सुरू झाला. डहाणू तसेच मुंबईतील तटरक्षक दलाची मदत मिळविण्यात पोलिसांना अपयश आले. उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन पांडकर, प्रांत अधिकारी, डहाणू व तलासरीचे तहसीलदार यांनी स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने समुद्राची माहिती घेऊन शोध मोहीम आखली. या करीता उंबरगाव किनाऱ्यावरून तीन बोटी रवाना करण्यात आल्या. पालघर पोलीस अधीक्षक शारदा राऊत यांनी भारतीय नौदलाकडे मदत मागितली असता पहाटे तीन वाजता हेलिकॉप्टरने शोध कार्य हाती घेतले. दरम्यान स्वबळावर समुद्रात शर्थीचे प्रयत्न करून सोमवारी पहाटे साडेतीन वाजता सूरजसह सर्व खलाशी उंबरगाव किनाऱ्यापर्यत पोहचले. महाराष्ट्र आणि गुजरात प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी खलाशांना उंबरगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांना तपासणीनंतर घरी पाठवण्यात आले. खलाशी सूरज माच्छीने अन्य चौदा खलाशांचे प्राण वाचविल्याने त्याचे विशेष कौतुक होत आहे. मच्छिमारांवरील अरिष्ट टळल्याने झाई गावात पूजेचे आयोजन करण्यात आले.
>नौका बुडू लागली. मदतीची आशाही संपली. अखेर बोटीतील साहित्यांचा तरफा बनवून सहकाऱ्यांसह पाण्यात उड्या घेतल्या, नशीब बलवत्तर असल्याने सर्वांचे प्राण वाचले.
- सूरज राजेश माच्छी,
अपघातग्रस्त नौकेवरील खलाशी
घटनास्थळी जाऊन आढावा घेतला. मच्छिमारांना मदत नाकारणाऱ्या सुरक्षा यंत्रणा व संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे.
- पास्कल धनारे, आमदार, डहाणू विधानसभा मतदार संघ