मोबाइल चोरीसाठी गर्दुल्ल्यांचा दोघांवर हल्ला
By admin | Published: June 8, 2017 02:26 AM2017-06-08T02:26:01+5:302017-06-08T02:26:01+5:30
गोवंडी-शिवाजीनगर हे सध्या अमलीपदार्थांचा अड्डा बनले आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गोवंडी-शिवाजीनगर हे सध्या अमलीपदार्थांचा अड्डा बनले आहे. अमलीपदार्थाच्या नशेसाठी अनेक तरुण गुन्हेगारीकडे वळले आहेत. सोमवारी रात्री याच परिसरात चार गर्दुल्ल्यांनी मोबाइल चोरीसाठी दोन तरुणांवर चाकूने हल्ला केला. या दोन्ही तरुणांवर सध्या सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
मोहम्मद सैफ आणि आरिफ कालिया अशी या जखमी तरुणांची नावे आहेत. ते गोवंडीच्या रफिकनगर परिसरात राहणारे आहेत. सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास दोघेही नैसर्गिक विधीसाठी डम्पिग ग्राउंडकडे गेले होते. त्यानंतर दोघेही घरी परतत असताना कब्रस्तान गार्डन परिसरात नशा करणाऱ्या चार गर्दुल्ल्यांनी त्यांना अडवले. या गर्दुल्ल्यांनी दोन्ही तरुणांचा मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला. दोघांनी विरोध करताच या आरोपींनी त्यांच्याजवळ असलेल्या चाकूने या दोघांवर वार केले. या हल्ल्यात दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले होते. काही रहिवाशांच्या हा प्रकार लक्षात येताच, त्यांनी तत्काळ या तरुणांना सायन रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. शिवाजीनगर पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. मंगळवारी या प्रकरणी दोघांना अटकदेखील करण्यात आली आहे. मात्र गेल्या काही वर्षांत गोवंडी-शिवाजीनगर परिसरात मोठ्या प्रमाणात अमलीपदार्थांची तस्करी वाढली आहे. त्यामुळे परिसरात गुन्हेगारी घटना वाढत असल्याचा आरोप रहिवासी करत आहेत.