मुगाच्या विषारी शेंगा खाल्ल्याने दोन मुलींचा मृत्यू
By admin | Published: August 27, 2016 02:58 AM2016-08-27T02:58:58+5:302016-08-27T02:58:58+5:30
तिस-या मुलीचीही प्रकृती गंभीर; अकोला जिल्ह्यातील पोपटखेड येथील घटना.
अकोला, दि. २६: तिघी मैत्रिणींनी शुक्रवारी सकाळी १0 वाजताच्या सुमारास मुगाच्या शेंगा खाल्ल्याने त्यांची प्रकृती बिघडल्याने तिघीही मुलींना दुपारी १२.३0 वाजताच्या सुमारास सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचार सुरू असतानाच तिघींपैकी एकीचा मृत्यू झाला तर दुसर्या मुलीची प्रकृती गंभीर झाल्याने तिला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले; परंतु तिचाही मृत्यू झाला. तिसर्या मुलीची प्रकृती गंभीर असून, तिच्यावर रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात उपचार करण्यात येत आहेत.
पोपटखेड येथील साक्षी विजय रंगारी (१४), आरती तिरथ उके आणि लक्ष्मी रवी गावंडे (१२) या तिघी मुली शुक्रवारी दुपारी शाळेतून घरी आल्या. तिघीचेही आई-वडील शेतमजूर असल्याने शेतात गेले होते. आरती उके व लक्ष्मी गावंडे या दोघी साक्षीच्या घरी जेवणाचे ताट घेऊन आल्या आणि तिघी जेवण करीत होत्या. दरम्यान, शेतातून तोडून आणलेल्या मुगाच्या शेंगा तिघींनी खाल्ल्या. काहीच वेळातच तिघींनाही मळमळ आणि उलट्या व्हायल्या लागल्या. पोट दुखू लागले; परंतु घरी कोणी नसल्याने, या तिघी मुली तशाच पडून राहिल्या. गावातील काही लोकांना ही बाब कळल्यानंतर त्यांच्या आई-वडिलांना शेतातून बोलावण्यात आले. आई-वडील घरी आल्यावर तिघींनाही थेट सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले. साक्षी रंगारी व आरती उके या दोघींची प्रकृती गंभीर होती; परंतु काही वेळातच आरती उके हिची प्रकृती आणखीच गंभीर झाली. उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर साक्षी रंगारी हिची प्रकृती खालावल्याने, तिच्या कुटुंबीयांना तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु साक्षीचाही मृत्यू झाला. अशी माहिती सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली. आरती व साक्षीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला असून, रात्री उशिरापर्यंत मृतदेहाचे शवविच्छेदन झाले नव्हते. लक्ष्मी गावंडे हिची प्रकृती पाहता, तिला सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात हलविण्यात आले आहे. दोघींचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. निरागस जीव आणि कुटुंबीयांचा आक्रोश पाहून रुग्णालयातील उपस्थितांचे डोळे पाणावले होते.
मुगाच्या शेंगा कोणाच्या शेतातील?
विषारी मुगाच्या शेंगा खाल्यामुळे दोन मुलींना आपला जीव गमवावा लागला. त्यांच्या कुटुंबीयांनी या विषारी मुगाच्या शेंगा कोणाच्या शेतातून तोडून आणल्या होत्या, याची चर्चा रुग्णालयात सुरू होती.