दोन गटात हाणामारी; १२ जणांविरूद्ध गुन्हा!
By admin | Published: January 22, 2017 08:36 PM2017-01-22T20:36:54+5:302017-01-22T20:36:54+5:30
जुन्या वादातून दोन गटात लोखंडी पाईप, काठयाने तुंबळ हाणामारी झाली.
ऑनलाइन लोकमत
जउळका रेल्वे, दि. 22 - जुन्या वादातून दोन गटात लोखंडी पाईप, काठयाने तुंबळ हाणामारी झाली. यात एकजण गंभीर जखमी झाला. जऊळका रेल्वे पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या डव्हा फाट्यावर घडलेल्या या घटनेप्रकरणी परस्परांविरूद्ध दाखल तक्रारींवरून पोलिसांनी दोन्ही गटातील १२ जणांना रविवार, २२ जानेवारीला अटक केली.
यासंदर्भात खिर्डा येथील महादेव काळापाड याने जउळका रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की वाशिम येथील रुग्णालयात शेषराव काळापाड यांच्यासमवेत जात असताना डव्हा फाट्यावरील ढाब्यावर जेवणासाठी थांबलो असताना एकनाथ वंजारे, सुरेश वंजारे, शामराव वंजारे, सुरेश महाजन, नारायण धनगर, रामदास महाजन आदिंनी जुन्या वादातून शिविगाळ करत लोखंडी पाईप आणि काठीने डोक्याला व पायाला मारहान करून जखमी केले. अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी एकनाथ वंजारे, सुरेश वंजारे, शामराव वंजारे, सुरेश महाजन, नारायण धनगर, रामदास महाजन या सहा जणांविरुद्ध कलम १४३, १४७, १४९, ३२३, ३२४, ५०४, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला. दुसऱ्या गटातर्फे एकनाथ वंजारे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की मी व माझा मेहुणा सुरेश महाराज दुचाकीने खिर्डा गावाकडे येत असताना आरोपींनी जुन्या वादातून आपणास मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. अशा तक्रारीवरून पोलिसांनी महादेव काळापाड, सुधाकर काळापाड, गोविंदा काळापाड, शेषराव काळापाड, अभिमान काळापाड, मारोती काळापाड या ६ जणांवर १४३, १४७, १४९, ३२३, ३२४, ५०६ भादंविअन्वये गुन्हा दाखल केला. संबंधित १२ ही आरोपींना रविवारी अटक करण्यात आली असून पुढील तपास जऊळका पोलिस करित आहे.