गळती शोधण्यासाठी खोदले दोनशे खड्डे, पालिकेचा प्रताप
By admin | Published: October 8, 2016 08:02 PM2016-10-08T20:02:41+5:302016-10-08T21:07:55+5:30
मुंबईतील खड्ड्यांसाठी युटिलिटिज कंपनींना दोष देणाऱ्या महापालिकेने गळती शोधण्यासाठी एकट्या एच पश्चिम विभागात चक्क दोनशे खड्डे खणल्याचे उजेडात आले आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 : मुंबईतील खड्ड्यांसाठी युटिलिटिज कंपनींना दोष देणाऱ्या महापालिकेने गळती शोधण्यासाठी एकट्या एच पश्चिम विभागात चक्क दोनशे खड्डे खणल्याचे उजेडात आले आहे. विशेष म्हणजे हे खड्डे खणण्यासाठी पालिकेने तब्बल १५ कोटी मोजले व त्यानंतर ते बुजविण्याकरिता आणखी २० लाख खड्ड्यात घातले असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे.
यावर्षी मुंबई पुन्हा एकदा खड्ड्यात गेली आहे. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्येही जुंपली आहे. तर मनसेने थेट रस्त्याच्या प्रमुख अभियंत्याला लक्ष्य केले. यावरुन मुंबईत खड्डे युद्ध सुरु आहे. करोडो रुपयांची रस्त्यांची कामं हाती घेऊनही मुंबई खड्ड्यात आहे. यासाठी ठेकेदार आणि अभियंत्यांना राजकीय पक्ष जबाबदार धरत आहेत. तर पालिका अधिकारी मुसळधार पाऊस, रस्त्यावर खोदले जाणारे चर यालाच दोष देत आहेत.
मात्र पालिकेने मुंबई पाणी वितरण सुधारणा कार्यक्रम (एमडब्ल्युडीआयपी) अंतर्गत केलेल्या प्रयोगाने एच पश्चिम विभागाला खड्ड्यात घातले. एमडब्ल्युडीआयपीसाठी नेमलेल्या कंपनीने गळती शोधण्याच्या नावाखाली एच पश्चिम विभागात दोनशे खड्डे खोदले. यापैकी केवळ ८० ठिकाणी किरकोळ गळती आढळून आली. या कामासाठी सदर कंपनीला मोबदला म्हणून पालिकेने १५ कोटी रुपये दिले. तर हे खड्डे बुजविण्यासाठी २० लाख रुपये खर्च आल्याची माहिती, अभियंता संघटनेचे पदाधिकारी सुखदेख काशिद यांनी दिली.
* एमडब्ल्युडीआयपी अंतर्गत मुंबईतील वितरण व्यवस्थेमध्ये सुधारणा केली जात आहे. यासाठी टी म्हणजे मुलुंड आणि एच पश्चिम म्हणजे वांद्रे या विभागांमध्ये प्रयोग हाती घेण्यात आला. त्यानुसार या कंपनीने गळती शोधण्यासाठी दोनशे ठिकाणी रस्ते खोदले. प्रत्यक्षात केवळ ८० ठिकाणीच गळती तेही किरकोळस्वरुपाची पाण्याची गळती आढळून आली.
* विशेष कार्य अधिकारी पदावर असलेल्या अधिकाऱ्याला पालिका आयुक्तांनी काढल्यानंतर त्याने संबंधित कंपनीमध्ये काम सुरु केले आहे. नियमानुसार पालिकेशी संबंधित कोणत्याही कंपनीमध्ये संबंधित अधिकारी काम करु शकत नाही. त्यामुळे याप्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी अभियंता संघटनेचे पदाधिकारी सुखदेव काशिद यांनी केली आहे.
* अभियंत्यांना प्रत्येकवेळीस खड्ड्यासाठी जबाबदार धरणाऱ्या महापालिकेने १५ कोटी अशाप्रकारे उडविल्याने याप्रकरणात न्यायालयात जाण्याचा इशारा काशिद यांनी दिला आहे.