ट्रान्स हार्बर लिंकला दोन महत्त्वाच्या मंजुरी
By admin | Published: January 3, 2016 03:20 AM2016-01-03T03:20:27+5:302016-01-03T03:20:27+5:30
शिवडी ते न्हावा या २२ किलोमीटर लांबीच्या ट्रान्स हार्बर लिंकच्या मार्गातील दोन मुख्य अडथळे आता दूर झाले असून, केंद्र सरकारने कोस्टल रेग्युलेटरी झोन (सीआरझेड) आणि वनविषयक मंजुरी
मुंबई : शिवडी ते न्हावा या २२ किलोमीटर लांबीच्या ट्रान्स हार्बर लिंकच्या मार्गातील दोन मुख्य अडथळे आता दूर झाले असून, केंद्र सरकारने कोस्टल रेग्युलेटरी झोन (सीआरझेड) आणि वनविषयक मंजुरी या प्रकल्पाला दिली असल्याचे मुुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सांगितले. यामुळे प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ शकेल.
मुंबई महापालिकेने बांधकाम नियमांसंदर्भात तयार केलेल्या मॅन्युअलचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले त्या वेळी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ आठ दिवसांपूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी या प्रकल्पातील अडथळ्यांबाबत नवी दिल्लीत चर्चा केली आणि त्यानंतर मंजुऱ्यांचे चक्र गतीने फिरले, असे मुख्यमंत्री म्हणाले. ११ हजार कोटी रुपये खर्चाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी अर्थसाहाय्य करणार असलेल्या जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सीशी (जायका) एक महिन्याच्या आत करार केला जाईल आणि या प्रकल्पाच्या उभारणीसाठीची निविदा येत्या फेब्रुवारी किंवा जास्तीत जास्त मार्चच्या सुरुवातीला काढण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. मार्चपर्यंत मुंबईकरिता हाउसिंग रेग्युलेटर नेमण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.