दोन जॉबवर्करना होणार अटक
By Admin | Published: April 20, 2015 02:10 AM2015-04-20T02:10:52+5:302015-04-20T02:10:52+5:30
केंद्रीय मूल्यांकन विभागातील गुणवाढ प्रकरणात आणखी दोन जॉबवर्कर्सचा सहभाग असल्याचे पोलीस चौकशीतून पुढे आले आहे.
अमरावती : केंद्रीय मूल्यांकन विभागातील गुणवाढ प्रकरणात आणखी दोन जॉबवर्कर्सचा सहभाग असल्याचे पोलीस चौकशीतून पुढे आले आहे. त्या दोघांनाही पोलीस लवकरच अटक करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जॉबवर्कर महेंद्र दमकेला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याच्या पोलीस कोठडीत एक दिवसाची वाढ करण्यात आली आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील गुणवाढ प्रकरणात आतापर्यंत १६ आरोपींना फे्रजरपुरा पोलिसांनी अटक केली आहे. त्यापैकी मुख्य आरोपी महेंद्र दमकेची पोलीस कोठडीत चौकशी सुरु होती. रविवारी पुन्हा त्याला न्यायालयात हजर करुन पोलिसांनी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती.
मात्र, न्यायालयाने त्याच्या कोठडीत एक दिवसाची वाढ केली. चौकशीदरम्यान पुन्हा पोलिसांसमोर दोन जॉबवर्करचे नाव पुढे आले आहे. त्या जॉबवर्कर्सचा गुणवाढ प्रकरणात सहभाग असल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात अद्यापही दोन विद्यार्थी पसार असून त्यांचाही शोध पोलीस घेत आहेत. (प्रतिनिधी)