वाळू माफियाकडून दोन तलाठ्यांचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 03:04 AM2017-09-25T03:04:08+5:302017-09-25T03:04:12+5:30
जप्त केलेले वाळूचे टिप्पर राजूर येथून तहसीलमध्ये घेऊन जाणा-या दोन तलाठ्यांचे वाळू माफियाने अपहरण केल्याची घटना भोकरदन तालुक्यात घडली.
भोकरदन (जि. जालना) : जप्त केलेले वाळूचे टिप्पर राजूर येथून तहसीलमध्ये घेऊन जाणा-या दोन तलाठ्यांचे वाळू माफियाने अपहरण केल्याची घटना भोकरदन तालुक्यात घडली. रविवारी सकाळी आठच्या सुमारास बरंजळा ठोंबरे ते जवखेडा ठोंबरे दरम्यान पंधरा किलोमीटर हा थरार सुरू होता. पोलीस व महसूल पथकाने ग्रामस्थांच्या मदतीने ट्रक अडवून तलाठ्यांची सुटका केली.
तहसीलदार संगीता कोल्हे यांच्या पथकाने सकाळी सातच्या सुमारास राजूर चौफुलीवर एका टिप्परला तीन ब्रास अवैध वाळूची वाहतूक करताना पकडले. चालकाने माहिती देण्यास टाळाटाळ केली. तहसीलदारांच्या सूचनेवरून चालक संतोष शिंदेला घेऊन तलाठी भागवत जाधव व रामेश्वर कांबळे हे टिप्परला घेऊन भोकरदन तहसीलकडे निघाले. काही अंतरावर एका जीपने टिप्परचा रस्ता अडवला व त्यामधून आलेल्या सर्जेराव नामेदव चव्हाण याने चालकाला खाली उतरवत टिपरचा ताबा घेतला. भरधाव टिप्परला बरंजळा रोडवर नेले.
तहसीलदारांचे पथक टिप्परचा पाठलाग करीत होते. कोल्हे यांनी फोनवरून या प्रकाराची माहिती हसनबाद पोलिसांना दिली. पोलीस व महसूल पथकाने टिप्परचा पंधरा किलोमीटर पाठलाग केला. यादरम्यान चव्हाणने दोन्ही तलाठ्यांना टिप्परमधून खाली ढकलण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहून ग्रामस्थांनी रस्त्यावर दगड टाकल्याने टिप्पर पुढे जाऊ शकला नाही.