उल्हासनगरजवळ दरड कोसळून २ ठार, ५ जखमी

By admin | Published: July 17, 2017 03:00 AM2017-07-17T03:00:18+5:302017-07-17T03:00:18+5:30

म्हारळ गावात लक्ष्मीनगर परिसरात टेकडीशेजारील घरांवर रविवारी पहाटे दरड कोसळून दोघांचा मुत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले.

Two killed, 5 injured in road accident near Ulhasnagar | उल्हासनगरजवळ दरड कोसळून २ ठार, ५ जखमी

उल्हासनगरजवळ दरड कोसळून २ ठार, ५ जखमी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : म्हारळ गावात लक्ष्मीनगर परिसरात टेकडीशेजारील घरांवर रविवारी पहाटे दरड कोसळून दोघांचा मुत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. पावसामुळे खचलेली जमीन आणि अनधिकृत बांधकामामुळे ही दुर्घटना घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे असून त्यांनी या प्रकरणी कारवाईची मागणी केली. जखमींवर मध्यवर्ती रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील एका मुलीला उपचारानंतर घरी पाठवण्यात आले.
सैफुद्दिन शेख (४५) आणि मोहम्मद इस्माल शेख (५०) यांचा ढिगाऱ्याखाली दबून जागीच मुत्यू झाला; तर परवेश बन्सलराज सिंग (२६), खुशबु सैफुद्दिन शेख (१६), फिरदोस इस्लाम मोहम्मद शेख (३८), नीलम प्रेमसिंग (१९) हे गंभीर जखमी झाले आहेत. सोना मोहम्मद इस्माल शेख (९) हिच्यावर औषधोपचार करून तिला डॉक्टरांनी घरी पाठविले.
उल्हासनगरच्या डम्पिंग ग्राऊंड शेजारच्या टेकडीवर अनेक चाळी बांधण्यात आल्या आहेत. त्यातील बरीचशी घरे अनधिकृत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तेथे टेकडीवर अनधिकृत घरे बांधली जात आहेत. पुरेशी काळजी (पान ४ वर) न घेता आणि माती, दरड कोसळेल याचा विचार न करता लोडबेअरिंग पद्धतीने घरे बांधण्याचे काम भर पावसातही सुरू आहे. या बांधकामांमुळे, मातीच्या उपशामुळे टेकडीचा काही भाग खचला. त्यातच दोन दिवसांतील पावसामुळे माती सरकली आणि पहाटे पाचच्या सुमारास मातीसह दरड चाळीतील घरांवर कोसळली. दरड कोसळून त्याखाली नागरिक अडकल्याची माहिती मनसेचे स्थानिक कार्यकर्ता बादशहा शेख यांना मिळाली. त्यांनी रहिवासी आणि सहकाऱ्यांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात हलविले.
दरड कोसळल्याचे समजताच परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी आक्रोश सुरू केला. मदतकार्यही सुरू झाले आणि नंतर तेथील अनधिकृत बांधकामांचा विषय चर्चेत आला. स्थानिक व्यक्ती, ग्रामपंचायतीचे काही सदस्य, बिल्डर, चाळमाफियांची नावे घेत आरोप सुरू झाले आहेत.
चार लाखांची मदत -
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमींची भेट घेऊन मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची आपत्कालीन मदत जाहीर केली. त्यांच्यासोबत शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, नेते धनंजय बोडारे आदी होते. पालकमंत्री रूग्णालयात येताच मृत-जखमींच्या नातेवाईकांनी, चाळीतील रहिवाशांनी अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. खबरदारीचा उपाय म्हणून रूग्णालयात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
अवैध बांधकामांवर ठपका-
टेकडी शेजारच्या चार घरांवर दरडीसोबतच अवैध बांधकामही पडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. टेकडी कितपत मजबूत आहे, हे न पाहता त्यावर लोडबेअरिंग पद्धतीने बांधकाम केल्याने मातीच्या ढिगाऱ्यासोबत बांधकामही खचले आणि ते चाळीवर कोसळले असे स्थानिकांचे म्हणणे आहे. म्हारळ गावाच्या हद्दीत आणि डम्पिंग ग्राउंडशेजारील टेकडीवर अनेक चाळी बांधण्यात आल्या आहेत.
या बांधकामांची तक्रार म्हारळ ग्रामपंचायतीत केली होती. त्यावर फक्त नोटिसा बजावण्यात आल्याने ही दुर्घटना घडली. त्यामुळे बांधकामे करणाऱ्या व्यक्तींसोबत म्हारळ ग्रामपंचायतीतील संबंधितांवर कारवाईची, त्यांच्यावर सदोष मनुष्यबधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणीही चाळीतील रहिवाशांनी केली.

Web Title: Two killed, 5 injured in road accident near Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.