रसायन कारखान्यातील स्फोटात दोन ठार
By admin | Published: January 19, 2015 04:07 AM2015-01-19T04:07:48+5:302015-01-19T04:07:48+5:30
तालुक्याच्या तासवडे येथील औद्योगिक वसाहतीमधील (एमआयडीसी) एका कंपनीत रविवारी सायंकाळी शॉर्टसर्किटने आग लागल्यानंतर रसायनाचा भीषण स्फोट
कऱ्हाड (सातारा) : तालुक्याच्या तासवडे येथील औद्योगिक वसाहतीमधील (एमआयडीसी) एका कंपनीत रविवारी सायंकाळी शॉर्टसर्किटने आग लागल्यानंतर रसायनाचा भीषण स्फोट झाला. त्यात दोन कामगार जागीच ठार झाले तर कंपनी मालकाच्या पत्नी व वडिलांसह अन्य पाच जण जखमी झाले. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या औद्योगिक वसाहतीत पाटणमधील किशोर प्रभाकर कुंभार यांची ‘मिआॅसिस केमिकल’ नावाची कंपनी आहे. औषध कंपन्यांना आवश्यक असणाऱ्या ‘फोर ब्रम्हो ब्रेन्झील फिनॉल’ या कच्च्या मालाचे या कंपनीतून उत्पादन केले जाणार होते. सध्या कंपनीत मालाचे संशोधन आणि परीक्षणाचे काम सुरू होते. त्यासाठी किशोर कुंभार यांच्यासह त्यांचे वडील प्रभाकर, पत्नी गीतांजली व सुमारे आठ कामगार दररोज कंपनीत काम करीत होते. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास कंपनीत काम सुरू असताना तळमजल्यावर शॉर्टसर्किट होऊन वायरिंगने पेट घेतला. नजीकच ठेवलेल्या मिथेनॉलच्या कॅनवर ठिणग्या पडल्याने मोठा स्फोट झाला. हा स्फोट एवढा भीषण होता की कंपनीच्या दुमजली इमारतीच्या सर्व काचा फुटून इतरत्र विखुरल्या. तसेच आग विझविण्यासाठी धावलेले दोन कामगार जागीच ठार झाले. तर प्रभाकर कुंभार, अनिल कणसे हे गंभीररीत्या भाजले. या धुरातच गीतांजली कुंभार, अश्विनी सूर्यवंशी व शाईशा निकम या तिघी गुदमरल्या. ग्रामस्थांनी त्यांना तातडीने रूग्णालयात हलविण्यात आले. (प्रतिनिधी)