निकामी दारुगोळ्याच्या स्फोटात दोन ठार

By Admin | Published: October 22, 2014 02:32 PM2014-10-22T14:32:41+5:302014-10-22T14:32:41+5:30

लष्कराच्या युद्ध सराव क्षेत्रात निकामी झालेला दारुगोळा गोळा करताना झालेल्या स्फोटात दोन जण ठार झाले, तर दोन जखमी झाले आहेत.

Two killed in explosion of ammunition explosion | निकामी दारुगोळ्याच्या स्फोटात दोन ठार

निकामी दारुगोळ्याच्या स्फोटात दोन ठार

googlenewsNext
>नगरच्या लष्कर युद्ध सराव क्षेत्रातील घटना
 
अहमदनगर : लष्कराच्या युद्ध सराव क्षेत्रात निकामी झालेला दारुगोळा गोळा करताना झालेल्या स्फोटात दोन जण ठार झाले, तर दोन जखमी झाले आहेत.
सुभाष दामू निकम (४0) व गणेश शिवाजी गायकवाड (४२) अशी मृतांची नावे असून दोघेही खारकर्जुने येथील रहिवासी आहेत. अहमदनगर तालुक्यातील खारे कर्जुने (के. के.) रेंजमध्ये मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर लष्करी आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून स्फोटाचा तपास सुरू झाला आहे.
नगर तालुक्यात खारे कर्जुने शिवारात आशिया खंडातील सर्वात मोठे लष्कराच्या युद्ध सरावाचे क्षेत्र आहे. या लष्करी हद्दीत नेहमीच युद्धाचा सराव केला जातो. त्यामुळे सरावादरम्यान तोफगोळे डागले जातात. त्यानंतर निकामी झालेले तोफगोळे, दारुगोळ्य़ांचे भंगार गोळा करण्यासाठी अनेक जण जीवावर उदार होतात. खारे कर्जुने ते भाळवणी या रस्त्याजवळून ही हद्द जाते. युद्ध सरावाच्या क्षेत्रालगत दगडांच्या भिंती ओलांडून अनेक जण डागलेले तोफगोळे, दारुगोळे घेण्यासाठी जातात. या भंगार विक्रीतून अनेकांचा उदरनिर्वाह चालतो. 
निकामी झालेला तोफगोळा हाताळताना येथे अनेकवेळा दुर्घटना घडल्या असून आतापर्यंत ५0 पेक्षा जास्त जणांचा बळी गेला आहे. मंगळवारी असाच प्रकार घडला. निकामी तोफगोळे हाताळत असतानाच स्फोट झाला. त्यात गंभीर जखमी होवून दोघांचा मृत्यू झाला. भानुदास गोपाळराव गायकवाड यांच्यासह दोन जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Two killed in explosion of ammunition explosion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.