मुंबई-पुणे महामार्गावरील वाहनांच्या अपघातात २ ठार
By Admin | Published: May 17, 2016 05:58 AM2016-05-17T05:58:55+5:302016-05-17T05:58:55+5:30
ट्रेलर, ट्रक, एसटी बस आणि कार या चार वाहनांमध्ये झालेल्या विचित्र अपघातात दोन जण ठार झाले
खोपोली : मुंबई - पुणे एक्स्प्रेस-वेवर रविवारी रात्री खोपोलीजवळ ट्रेलर, ट्रक, एसटी बस आणि कार या चार वाहनांमध्ये झालेल्या विचित्र अपघातात दोन जण ठार झाले. अपघातानंतर एक्स्प्रेस-वेवर काही काळ वाहतूककोंडी झाली होती. महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर आली.
रविवारी रात्री ९ च्या सुमारास लोखंडी बीम घेवून एमएच ४६ एच ४५५० या क्र मांकाचा ट्रेलर पुणे येथून मुंबईकडे जात होता. मुंबई - पुणे एक्स्प्रेस-वेवर खोपोली एक्झिटजवळ आल्यानंतर भरधाव वेगात असलेल्या ट्रेलरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रेलरने पुढे जात असलेल्या एमएच २० बीएल ३१९२ या एसटीला धडक दिली. यामुळे एसटीने पुढे असलेल्या ट्रक एमएच ४६ एआर ०८६४ आणि कार एमएच ०२ सीडी ४७२१ या दोन वाहनांना जोराची धडक दिली. धडक दिल्यानंतर भरधाव वेगातील ट्रेलर पुढे जावून रस्ता दुभाजकाला धडकून पलटी झाला. या अपघातामध्ये ट्रेलर चालक रोफुद्दिन शौकत अली (६१, रा. मुंबई) आणि क्लिनर आरिफ अली (२१, रा. उत्तर प्रदेश) हे दोघे जागीच ठार झाले. अपघातात ट्रकमधील प्रवासी सुखरूप तर एसटी आणि कारमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले. अपघाताची नोंद खोपोली पोलीसांत करण्यात आली.