बीडमध्ये दोन लाखांच्या बनावट नोटा जप्त
By admin | Published: June 19, 2017 10:47 PM2017-06-19T22:47:53+5:302017-06-19T22:47:53+5:30
घड्याळ दुरुस्ती आणि झेरॉक्स दुकानात नव्या बनावट नोटांची छपाई करणाऱ्या दोघांना बीडच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने ताब्यात घेतले
ऑनलाइन लोकमत
आष्टी, दि. 19 - घड्याळ दुरुस्ती आणि झेरॉक्स दुकानात नव्या बनावट नोटांची छपाई करणाऱ्या दोघांना बीडच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आष्टी पोलीस ठाण्यात सुरू होती.
शहानवाज सादेक खान (२७, रा. दारूगल्ली, आष्टी) व भरत मारुती लगडे (रा. लोणी व्यंकनाथ, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. आष्टी शहरातील स्टेशन रोडवर एसबीआय बँकेसमोर शहानवाज सादेकचे बॉम्बे वॉच कंपनी अँड झेरॉक्सचे दुकान आहे. एसबीआय बँक जवळ असल्याने येथे नेहमी वर्दळ असते. तसेच घड्याळीची विक्री, दुरुस्तीही शहानवाज करायचा. या झेरॉक्स मशीनवर बनावट नोटा तयार करीत असल्याची माहिती बीडच्या दरोडा प्रतिबंधक पथकाला खबऱ्यामार्फत मिळाली होती. यावर पोलिसांनी खात्री करून सोमवारी रात्री साडेनऊ वाजता धाड टाकत बनावट नोटा बनविण्याचा पर्दाफाश केला.
जप्त केलेल्या नोटांमध्ये दोन हजार, पाचशे, शंभर, पन्नास व दहा रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. ही रक्कम २ लाख १५ हजार ७४३ एवढी असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.