युरियाचा दोन लाख मेट्रीक टन साठा करणार
By Admin | Published: October 29, 2015 01:06 AM2015-10-29T01:06:42+5:302015-10-29T01:06:42+5:30
रब्बी हंगामासाठी युरिया खताचा दोन लाख मेट्रीक टन संरक्षित साठा करण्याचा निर्णय कृषिमंत्री एकनाथ खडसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला.
मुंबई : रब्बी हंगामासाठी युरिया खताचा दोन लाख मेट्रीक टन संरक्षित साठा करण्याचा निर्णय कृषिमंत्री एकनाथ खडसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला.
राज्यात सध्या युरियासह अन्य खतांचा तुटवडा नाही. मात्र, डिसेंबर व जानेवारीत मागणीपेक्षा पुरवठा कमी होत असल्याचे लक्षात घेता, युरियाचा संरक्षित साठा करणे आवश्यक आहे. त्यामुळे रब्बी हंगामासाठी दोन लाख मेट्रीक टन युरिया खताचा संरक्षित साठा करण्याचे निर्देश विभागाला देण्यात आले आहे. या खताचा साठा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी विकास महामंडळ (एमएआयडीसी), महाराष्ट्र राज्य सहकारी पणन मंडळ (मार्कफेड) व विदर्भ को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, नागपूर (व्हिसीएमएफ) या संस्थांची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. युरियाचा संरक्षित साठा करण्यासाठी या संस्थांना आवश्यक तेवढे बँक कर्ज घेण्याच्या प्रक्रियेस बैठकीत मंजुरी देण्यात आल्याचे खडसे यांनी सांगितले.
दिल्ली येथे आॅगस्टमध्ये झालेल्या विभागीय खत परिषदेमध्ये महाराष्ट्रासाठी ११.५० लाख मेट्रीक टन युरिया मंजूर करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त ०.५० लाख मेट्रीक टन युरिया राखीव साठ्याच्या स्वरूपात उपलब्ध होणार आहे. त्याचे दरमहा समान वितरण करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. युरियाचा प्रमाणापेक्षा जास्त वापर करू नये, यासाठी शेतकऱ्यांमध्ये जाणीव जागृती करण्याचे निर्देश ही यावेळी दिले. (प्रतिनिधी)