दोन लाख सोलापुरी चादरींची पूरग्रस्तांना ऊब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 12:40 PM2019-08-21T12:40:15+5:302019-08-21T12:42:14+5:30
संकटसमयी उत्पादन दुपटीने वाढविले; दिवस-रात्र कारखानदार अन् कामगारांचे उत्स्फूर्तपणे काम
महेश कुलकर्णी
सोलापूर : कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी सोलापूरच्या यंत्रमाग उद्योगाने कमी कालावधीत दोन लाख चादरी उत्पादित केल्या आहेत. सोलापूरसह महाराष्ट्रातील अनेक स्वयंसेवी संस्थांच्या मागणीला प्रतिसाद देऊन मोठ्या नैसर्गिक संकटात सापडलेल्या पूरग्रस्तांना मदत करायच्या उद्देशाने दिवस-रात्र उत्पादन करून या चादरी पाठविण्यात आल्या आहेत.
भूकंप किंवा महापुरासारख्या नैसर्गिक आपत्तीवेळी उघड्यावर पडलेल्या संसाराला आधार देण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंसोबतच उबदार कपड्याचीही आवश्यकता असते. चादरीचे उत्पादन महाराष्ट्रात मोजक्या ठिकाणी होते. भिवंडी, मालेगाव, इचलकरंजी आणि सोलापूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चादरी बनतात. इचलकरंजी परिसराच्या काही भागात पुराचे पाणी गेल्यामुळे येथील उत्पादन पूर्णपणे बंद आहे. अशा परिस्थितीत पूरग्रस्त परिसराच्या जवळचे गाव म्हणजे सोलापूर.
एकेकाळी सोलापूर चादरी बनण्यासाठी महाराष्ट्रात क्रमांक एक होते, परंतु शासनाचे धोरण आणि अर्थपुरवठ्याअभावी चादरी बनविणारे लुम याठिकाणी कमी झाले. अशाही परिस्थितीत पूरग्रस्तांना मदतीसाठी सोलापूरच्या कारखानदारांनी दुप्पट उत्पादन केले. अडचणीच्या काळात मदतीचा हात देण्यासाठी आपणही कुठे मागे राहता कामा नये, या उद्देशाने कामगारांनीही नेहमीपेक्षा दुप्पट योगदान देऊन मोठ्या प्रमाणात चादरींचे उत्पादन केले. लातूर जिल्ह्यातील किल्लारी आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील सास्तूर येथे झालेल्या भूकंपावेळीही सोलापूर चादरींनी संकटात सापडलेल्या भूकंपग्रस्तांना मोठा दिलासा दिला होता.
पंधरा दिवसांत दोन लाख चादरींचे उत्पादन
- सोलापूरसह महाराष्ट्रातील अनेक स्वयंसेवी संस्थांनी पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सोलापूरच्या कारखानदारांना विनंती करून मागणी नोंदविली. याबरोबरच देशातील इतर ठिकाणाहून विक्रीसाठी बनविण्यात आलेल्या चादरीही पूरग्रस्तांना देण्यात आल्या. विक्रीसाठी आगाऊ बुकिंग करणाºया व्यापाºयांनीही मोठ्या मनाने तयार चादरी पूरग्रस्तांना पाठविण्याची परवानगी दिल्याने केवळ १५ दिवसांत जवळपास दोन लाख चादरी पूरग्रस्तांसाठी पाठविण्यात आल्या.
सोलापुरातील अनेक सामाजिक संस्थांनी हजारो चादरी आमच्याकडून पूरग्रस्तांना देण्यासाठी नेल्या आहेत. पूरग्रस्तांना दिलासा मिळावा म्हणून आम्ही सर्व दुकानातील चादरी गोळा करून सामाजिक संस्थांना दिल्या.
- बसवराज निंगदळ्ळी, चादर विक्रेते.
यंत्रमागधारक संघाची मदत
- नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नेहमीच मदतीला तत्पर असणाºया सोलापूरकरांच्या यंत्रमागधारक संघाने सर्वप्रथम पूरग्रस्तांना एक हजार चादरी, पाच हजार टॉवेल्स पाठविले. याबरोबरच जीवनावश्यक वस्तू आणि धान्यही संघाच्या वतीने पाठविण्यात आले. ही मदत प्रत्यक्ष जाऊन पोहोचविण्यात आल्याची माहिती संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी दिली.
सांगली, कोल्हापूर आणि सातारा शहरातील पाणी सध्या ओसरले आहे. येथे प्रशासनाने साफसफाईचे काम वेगाने सुरू केलेले आहे; मात्र ग्र्रामीण भागातील परिस्थिती अद्यापही सुधारलेली नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था आजही आमच्याकडे चादरी मागणी नोंदवत आहेत. आम्ही वेगाने ही मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
- पेंटप्पा गड्डम, अध्यक्ष यंत्रमागधारक संघ, सोलापूर.