दोन सावकारांना अटक

By admin | Published: December 30, 2015 12:54 AM2015-12-30T00:54:06+5:302015-12-30T00:57:35+5:30

बनेवाडी प्रकरण : निवृत्त पोलिसाचा समावेश; आणखी दोघांची नावे निष्पन्न

Two lenders are arrested | दोन सावकारांना अटक

दोन सावकारांना अटक

Next

इस्लामपूर : बनेवाडी (ता. वाळवा) येथील एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी दोन सावकारांना मंगळवारी सायंकाळी अटक केली. त्यात एक निवृत्त पोलिसाचा समावेश आहे. याबाबत चौघा सावकारांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे, यासह सावकारी गुन्ह्यांची नोंद मंगळवारी पहाटे तीन वाजता करण्यात आली.
अटक केलेल्यांमध्ये मोहन केशव पाटील (वय ४२, रा. ताकारी, ता. वाळवा) व निवृत्त पोलीस जयवंत विष्णू पाटणकर (५२, रा. बोरगाव) यांचा समावेश आहे. श्रीकांत चमणराव जाधव, विकास कुमार पाटील (दोघे रा. ताकारी) हे संशयित फरारी आहेत. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.
याप्रकरणी मृत संजय यादव यांचे मेहुणे संजय महादेव खोत (रा. पडवळवाडी, ता. वाळवा) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. सावकारांच्या जाचाला कंटाळून सोमवारी पहाटे संजय भीमराव यादव (५०, रा. बनेवाडी) यांच्यासह त्यांची पत्नी जयश्री यादव (३०) यांनी आत्महत्या केली होती. तत्पूर्वी, मुलगा राजवर्धन (४ वर्षे) आणि मुलगी समृद्धी (४ महिने) यांना यादव दाम्पत्याने गळा आवळून ठार मारले होते.
जयश्री व संजय यांचा २०१० मध्ये विवाह झाला होता. तीन वर्षांपूर्वी आईचे आजारपण, पत्नीचे बाळंतपण व बेकरी व्यवसायामुळे त्यांची आर्थिक ओढाताण झाली होती. त्यामुळे संजय यादव यांनी सावकारांकडून वेळोवेळी सात ते आठ लाख रुपयांचे मासिक दहा टक्केव्याजाने कर्ज घेतले होते. दोन वर्षांपूर्वी यादव यांनी पत्नीचे गंठण गहाण ठेवून व्याजापोटी सावकारांना ५० हजार रुपये दिले होते. त्यावेळी विकास पाटील यांचे तीन लाख रुपयांचे व्याज देऊनही तो पाच लाखांची मागणी करीत होता. श्रीकांत जाधव एक लाख रुपये व्याजासह मागत होता, तर जयवंत पाटणकर २० हजारांसाठी, मोहन केशव पाटील ३० हजार रुपयांसाठी तिप्पट रकमेची मागणी व्याजासह करीत होते.
या दरम्यान मेहुणे संजय खोत यांनी यादव यांना एक लाख रुपये व म्हैस दिली होती. त्यावेळीही यादव यांनी सावकारांचे व्याज भागविले होते. मात्र, तरीही पाटणकर हा म्हैस घेऊन जाण्याची धमकी देत होता. ही माहिती यादव यांनी २५ डिसेंबरला मेहुणे संजय यांना दिली होती. जयश्री यांनीही दूरध्वनीवरून ‘चौघे सावकार पैशांचा तगादा लावत आहेत, त्यामुळे पैशांची काहीतरी तरतूद कर, नाहीतर पती आम्हाला घरातून हाकलून देतील’, असे मेहुण्याला सांगितले होते. २७ डिसेंबरला संजय यादव मुलगा राजवर्धनला घेऊन पडवळवाडीला गेले होते.
त्यावेळीही त्यांनी ‘पाटणकर हा ६५ हजार रुपये मागतोय, त्यासाठी थोडे पैसे द्या’, अशी विनंती मेहुण्याला केली होती. त्यांनी म्हैस विकून येतील ते पैसे द्या, असा सल्ला दिला. त्यानंतर संजय यादव यांनी संपूर्ण कुटुंब संपविण्याचा निर्णय घेतला, असा पोलिसांचा अंदाज आहे. (वार्ताहर)
चिठ्ठीतील मजकूर उघड
सावकार श्रीकांत जाधव, विकास पाटील (ताकारी) यांनी नोटरी करून धनादेश घेतले आहेत. पाटणकर आप्पा (बोरगाव) याने चार धनादेश घेतले आहेत, तर मोहन आबाने दोन धनादेश घेतले आहेत. या सर्वांच्या त्रासाला कंटाळून सर्व कुटुंब आत्महत्या करीत आहे. घेतलेल्या रकमेला सावकारांकडून प्रत्येक दिवसाला पाच हजार रुपये दंड लावला जात होता. कोरे धनादेश घेऊन पैसे दिले नाहीस, तर गावातून हाकलून देण्याची धमकी देत होते, असे संजय यादव यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे.

Web Title: Two lenders are arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.