दोन महिन्यांतील मोटार खरेदी आता ‘आयटी’च्या रडारवर

By Admin | Published: December 29, 2016 03:50 AM2016-12-29T03:50:38+5:302016-12-29T03:50:38+5:30

नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर गेल्या दोन महिन्यांत मोटारी खरेदी करणाऱ्यांना प्राप्तिकर विभाग आता रडारवर घेणार असून, अशा खरेदीदारांची सर्व माहिती घेण्यासाठी विभागाने

The two-month car purchase is now on the IT radar | दोन महिन्यांतील मोटार खरेदी आता ‘आयटी’च्या रडारवर

दोन महिन्यांतील मोटार खरेदी आता ‘आयटी’च्या रडारवर

googlenewsNext

मुंबई : नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर गेल्या दोन महिन्यांत मोटारी खरेदी करणाऱ्यांना प्राप्तिकर विभाग आता रडारवर घेणार
असून, अशा खरेदीदारांची सर्व माहिती घेण्यासाठी विभागाने मोटारी विकणाऱ्या ५०हून अधिक प्रमुख डीलरना नोटिसा पाठविल्या आहेत.
नोटाबंदीनंतर अनेकांनी चलनातून बाद झालेल्या नोटा देऊन मोटारींची खरेदी केल्याचा प्राप्तिकर विभागास संशय आहे. एकूणच उघडपणे उत्पन्न दाखवून त्यावर रीतसर कर भरणारे आणि मोटारींची विक्री, यांच्या आकडेवारीतील विसंगती मोठ्या प्रमाणावर करबुडवेगिरीकडे संकेत करणारी आहे. या दृष्टीने प्राप्तिकर विभागाने या नोटिसा पाठविल्या आहेत.
या नोटिसा पाठवून प्राप्तिकर विभागाने गेल्या दोन महिन्यांत मोटारी खरेदी केलेल्या ग्राहकांची नावे, त्यांच्या बँक खात्यांचा तपशील, पत्ते, खरेदी केलेल्या मोटारींची मॉडेल, खरेदीची तारीख, अदा केलेली रक्कम यासह इतर माहिती देण्यास डीलरना सांगितले आहे.
डीलरकडून मिळणाऱ्या माहितीची छाननी केली जाईल व त्यातून जे व्यवहार संशयास्पद वाटतील, त्यांची चौकशी ३० डिसेंबरनंतर सुरू केली जाईल, असेही या सूत्रांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)

करदाते २४ लाख; दरवर्षी वाहन विक्री २५ लाख

- ज्या लोकांकडे मोटारी खरेदी करण्याएवढा पैसा आहे, त्यापैकी सर्वच खरे उत्पन्न दाखवून त्यावर कर भरत नाहीत, असे स्पष्ट संकेत प्राप्तिकर विभागाकडील आकडेवारी व मोटारविक्रीचे आकडे यावरून मिळतात.
ज्यांनी रीतसर रिटर्न भरून 10लाख रुपयांहून अधिक वार्षिक उत्पन्न दाखविले आहे, असे करदाते २४.४ लाख आहेत.

- या तुलनेत गेली सलग तीन वर्षे देशात वर्षाला सरासरी २५ लाख मोटारींची विक्री झाली आहे. एक कोटी किंवा त्याहून अधिक उत्पन्नाचे रिटर्न भरणारे करदाते ४८,४१७ आहेत. त्या तुलनेत बीएमडब्ल्यू, आॅडी, जग्वार, मर्सिडिस, पोर्शे व मासेराती यासारख्या आलिशान मोटारी खरेदी करणाऱ्यांची वार्षिक संख्या सुमारे ३५ हजार आहे.

एरव्हीच्या तुलनेत गेल्या दोन महिन्यांत मोटारींच्या खरेदीत लक्षणीय वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. काळा पैसा हुडकणे व तो बाहेर काढणे, हाही नोटाबंदीचा एक प्रमुख हेतू आहे. त्यामुळे बाद नोटांच्या रूपाने काळा पैसा वापरून मोटारी खरेदी केल्या गेल्या काय, याचा शोध घेण्यासोबतच संभाव्य करबुडव्यांचाही या माहितीतून छडा लावणे शक्य होईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: The two-month car purchase is now on the IT radar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.