...तर दोन महिन्यांनी आयुक्तांना पुन्हा मारायला येऊ: बच्चू कडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 07:14 PM2017-07-24T19:14:20+5:302017-07-24T19:14:20+5:30
महानगरपालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्यावर हात उगारून शाब्दिक वाद घातल्याप्रकरणी अचलपूर विधानसभा मतदार संघाचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांना पोलिसांनी अटक करून जिल्हा न्यायालयात हजर
Next
>ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 24 - महानगरपालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्यावर हात उगारून शाब्दिक वाद घातल्याप्रकरणी अचलपूर विधानसभा मतदार संघाचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांना पोलिसांनी अटक करून जिल्हा न्यायालयात हजर केले होते. जिल्हा व सत्र न्यायालायाने कडू यांना जामीन मंजूर केला आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांनी त्यांना अटक केली होती. नाशिकच्या मनपा आयुक्तांवर हात उगारल्याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आला आहे.
यावेळी लोकमतसोबत बोलताना, "आज मारले नाही तरी मारल्याची फिर्याद दिली . आता अपंग बांधवाना न्याय दिला नाही तर दोन महिन्यांनी अभिषेक कृष्ण यांना पुन्हा मारायला येऊ असा इशारा आमदार कडू यांनी दिला.
नाशिक महापालिकेने 1995चा अपंग पुनर्वसन कायदा अद्याप अंमलात आणला नाही. तसेच अपंगांचा राखीव तीन टक्के निधी आजपर्यंत खर्च केला जात नसल्यामुळे मनपा मुख्यालयासमोर दुपारी बारा वाजेपासून धरणे आंदोलन सुरू आहे. प्रहार संघटनेच्या नेतृत्त्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाचे नेतृत्त्व करणारे आमदार बच्चू कडू यांनी शिष्टमंडळासमवेत महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या शाब्दिक वादानंतर कडू यांचा संयम सुटला आणि त्यांनी थेट कृष्ण यांच्यावर हात उगारला. शिष्टमंडळाच्या कार्यकर्त्यांनी कडू यांना रोखले अन्यथा अनर्थ झाला असता. नाशिकच्या मनपा आयुक्तांवर हात उगारल्याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आला आहे. शाब्दिक वादानंतर नाशिकच्या महापालिका आयुक्तांवर त्यांनी हात उगारला होता.