दोन महिन्यापासून शिक्षक पगारापासून वंचित
By Admin | Published: May 7, 2014 08:39 PM2014-05-07T20:39:49+5:302014-05-07T20:57:35+5:30
मार्च व एप्रिल या दोन महिन्यांचे संपूर्ण शिक्षकांचे पगार अद्यापही झालेले नाहीत. त्यामुळे ऐन लग्नसराईच्या काळामध्ये सर्व शिक्षक आर्थिक तंगीचा सामना करीत आहेत.
सिंदखेडराजा : मार्च व एप्रिल या दोन महिन्यांचे संपूर्ण शिक्षकांचे पगार अद्यापही झालेले नाहीत. त्यामुळे ऐन लग्नसराईच्या काळामध्ये सर्व शिक्षक आर्थिक तंगीचा सामना करीत आहेत. शासनाच्या निर्देशानुसार महिन्याच्या १ तारखेलाच पगार होणे अपेक्षित आहे. परंतु अधिकारी व कर्मचार्यांच्या मनमानीमुळे शिक्षक बांधवांना कृत्रिम आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागत आहे. शालार्थ वेतन प्रणालीचे कारण पुढे करुन जिल्हा व तालुका शिक्षण विभाग परस्परांवर दोष ठेवून पगाराच्या विलंबाचे समर्थन करीत आहेत. शालार्थ वेतन प्रणालीमध्ये कामाच्या नियोजनाचा अभाव असल्यामुळे या कामाला पाच महिन्याचा उशिर झाला. त्याचे खापर मात्र शिक्षकांच्या माथी फोडण्यात येत आहे. संबंधित कर्मचार्यांना या ना त्या कारणामुळे दररोज घसघशीत पॉकेटमनी मिळत असल्यामुळे शिक्षकांच्या पगाराच्या निर्धारित तारखेचे त्यांना भान राहत नाही. जि.प. व पं.स. मधील शिक्षण विभागातील कर्मचार्यांकडे या संदर्भात विचारणा केली असता त्यांच्याकडून टोलवा टोलवीची व परस्पर विसंगत विधाने ऐकायला मिळतात. पगार विलंबाला शिक्षक जबाबदार नसून शिक्षण विभागातील कर्मचारी जबाबदार आहेत. शिक्षकांचे दोन महिन्यांचे पगार थकले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो शिक्षकांचे कुटूंबिय आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत. तरी शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांनी तात्काळ निर्णय घेवून शिक्षकांचे दोन महिन्याचे पगार लवकरात लवकर अदा करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुख सभेचे जिल्हाध्यक्ष टी.के.देशमुख, सरचिटणीस रविंद्र नादरकर यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)