उष्णतेची ‘कमाल’, पाऱ्याची धमाल; मुंबईसह राज्यात आणखी दोन दिवस लाटेचे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 12:34 PM2023-05-15T12:34:48+5:302023-05-15T12:35:29+5:30
राज्यात नंदुरबार, धुळे, जळगाव व विदर्भातील सर्व जिल्ह्यात पुढील २ ते ३ दिवस उष्णतेच्या लाटीची शक्यता असून, त्यानंतर कदाचित २ डिग्रीने तेथे तापमान उतरू शकते.
मुंबई : उच्च कमाल तापमान, आर्द्रता व गरम हवेमुळे मुंबईसह संपूर्ण कोकणात उष्णतेच्या काहिलीने जाणवत असलेली अस्वस्थता कायम असून, पुढील २ ते ३ दिवस कमाल तापमानाचा पारा चढाचा राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना आणखी दोन दिवस वाढत्या कमाल तापमानाचा सामना करावा लागणार असून, त्यानंतर नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
राज्यात नंदुरबार, धुळे, जळगाव व विदर्भातील सर्व जिल्ह्यात पुढील २ ते ३ दिवस उष्णतेच्या लाटीची शक्यता असून, त्यानंतर कदाचित २ डिग्रीने तेथे तापमान उतरू शकते. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर व मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत पुढील ५ दिवसांत २-३ डिग्रीने दिवसाच्या कमाल तापमानात घट होऊ शकते, अशी माहिती निवृत्त हवामान अधिकारी माणिकराव खुळे यांनी दिली.
कुठे किती तापमान? -
मुंबई ३३.७
माथेरान ३६.२
नाशिक ३६.३
पुणे ३७.५
जळगाव ४३.२
मालेगाव ४३.२
परभणी ४३
बीड ४२.७
रविवारी सकाळी ११ नंतर मध्य भारत आणि उत्तर पश्चिम भारतात अनेक भागांत कमाल तापमानाची नोंद ३७ ते ४० अंश सेल्सिअसदरम्यान झाली आहे. कोरडे आणि उष्ण वारे या भागात वाहत आहेत.
- कृष्णानंद होसाळीकर,
अतिरिक्त महासंचालक, भारतीय हवामान शास्त्र विभाग