मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाला आणखी दोन दिवस बसणार पावसाचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 08:02 PM2020-03-28T20:02:55+5:302020-03-28T20:07:03+5:30
२९ मार्च रोजी महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता
पुणे : मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला़ कोकण, गोव्यात हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाला आणखी दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात रविवारी २९ मार्च रोजी जोरदार वार्यासह गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़
उत्तर केरळ ते दक्षिण छत्तीसगड आणि कर्नाटक, मराठवाडा आणि विदर्भ या दोन्ही बाजूंनी तसेच कर्नाटक ते दक्षिण गुजरात असा द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दक्षिणकडून येणारे वारे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराकडून बाष्पयुक्त वारे आपल्याकडे खेचून घेत आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रासह छत्तीसगड, मध्य प्रदेशापर्यंत पाऊस पडत
आहे. शनिवारी सकाळी संपलेल्या २४ तासात गंगापूर येथे ४१ मिमी इतका पाऊस पडला.राहुरी २८, अहमदनगर ६, फुलंब्री २०, बुलढाणा २, अमरावती, ब्रम्हपूरी,सिंधखेड राजा येथे प्रत्येकी १ मिमी आणि सातारा व पुणे येथे ०.७ मिमी
पावसाची नोंद झाली होती.कोकण, गोव्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात कमाल व किमान तापमानात किंचित घट झाली आहे.२९ मार्च रोजी महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
३० मार्च रोजी मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह गारांच्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वार्यासह पावसाची शक्यता आहे.