मराठवाड्यात आणखी दोन शेतक-यांच्या आत्महत्या
By admin | Published: December 4, 2014 02:35 AM2014-12-04T02:35:23+5:302014-12-04T02:35:23+5:30
नापिकी आणि कर्जाला कंटाळून मराठवाड्यातील आणखी दोन शेतकऱ्यांनी स्वत:ला संपविले तर एकाने पेटवून घेतले.
सेनगाव, (जि. हिंगोली)/ लोहारा (जि. उस्मानाबाद) : नापिकी आणि कर्जाला कंटाळून मराठवाड्यातील आणखी दोन शेतकऱ्यांनी स्वत:ला संपविले तर एकाने पेटवून घेतले. ९० टक्के भाजलेला हा शेतकरी रूग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. गेल्या तीन दिवसांत मराठवाड्यात १४ शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले आहे़
दाताडा खुर्द (जि. हिंगोली) येथील कानबा जयाजी सरगड (४०) यांना चार एकर शेती असून, शेतात नापिकी झाली. खाजगी सावकाराचे कर्ज डोक्यावर असताना मुलीचे लग्न कशाने करावयाचे? या विवंचनेत ते १ डिसेंबरपासून घर सोडून गेले होते. बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास गावातीलच एका शेतात त्यांचा मृतदेह आढळला. विषारी औषध प्राशन करून त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आहे.
दुसऱ्या घटनेत हिंगोली जिल्ह्णातील धोतरा येथील रामभाऊ ढोणे (५५) यांनी दोन एकर जमिनीत सोयाबीन घेतले. लागवड खर्चही निघाला नाही. हैदराबाद बँकेत जमीन गहाण ठेवून ३ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले. त्याचे व्याज वाढत असताना पुन्हा १ लाखाचे कर्ज काढले. भविष्याच्या चिंतेत २७ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजता राहत्या घरी विष प्राशन केले. त्यांना हिंगोली येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान २ डिसेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. रामभाऊ ढोणे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, विधवा बहीण असे कुटुंब आहे. उस्मानाबाद जिल्ह्णातील लोहारा येथील मनोहर लक्ष्मण यल्लोरे (५६) यांनी मंगळवारी रात्री रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. ते सुमारे नव्वद टक्के भाजले आहेत. त्यांना उस्मानाबाद येथील जिल्हा रूग्णालयात दाखल केले असून, ते मृत्यूशी झुंज देत आहेत़
मनोहर यल्लोरे यांच्याकडे साडेबारा एकर जमीन आहे. त्यांच्या कुटुंबात आई, पत्नी, एक विवाहीत मुलगा, मुलगी व अविवाहीत मुलगा असा परिवार आहे. मनोहर यल्लोरे यांचे वडील लक्ष्मण यांनी विविध कार्यकारी सेवा सोसायटीकडून २००८ रोजी ६८ हजार ५०० रूपये कर्ज घेतले होते. २००९ मध्ये हे कर्ज थकीत गेले व यानंतर वडिलांचाही मृत्यू झाला. सद्यस्थितीत या कर्जापोटी ६८ हजार ५०० रूपये मुद्दल आणि ५३ हजार ४३० रूपये व्याज असे एकूण १ लाख २१ हजार ९३० रूपये देणे आहे. (प्रतिनिधी)