दोन मोटारसायकल चोरांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 10:11 PM2019-04-15T22:11:55+5:302019-04-15T22:12:11+5:30
रेल्वेप्रवाश्यांच्या वाहनांना चोरणाऱ्या टोळीतील दोन सदस्यांना रेल्वे सुरक्षा बलच्या टास्क टीमने शुक्रवारी (दि.१२) पकडले. त्यांच्या जवळून सहा मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : रेल्वेप्रवाश्यांच्या वाहनांना चोरणाऱ्या टोळीतील दोन सदस्यांना रेल्वे सुरक्षा बलच्या टास्क टीमने शुक्रवारी (दि.१२) पकडले. त्यांच्या जवळून सहा मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.
शहरातील मालवीय वॉर्डातील प्रीतम प्रेमचंद झाडे (२७) हे आपल्या नातेवाईकांना रेल्वेस्थानकावर सोडण्यासाठी १० एप्रिल रोजी रात्री ९ वाजता आले होते. त्यांची एमएच ३५-क्यू ९१३० ही मोटारसायकल स्थानकाबाहेर ठेवली होती. ती बेपत्ता होताच त्यांनी रेल्वे सुरक्षा बलला याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे रेल्वे सुरक्षा बालच्या जवानांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले व चौकशी सुरू केली असता शुक्रवारी (दि.१२) दुपारी श्री टॉकीजजवळील दारूच्या दुकानाजवळ त्याच क्रमांकाच्या मोटारसायकलला धक्का मारत दोन इसम घेऊन जात होते. त्यांना पकडून विचारपूस केल्यावर ते रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम अंभोरा येथील रहिवासी असून दिनेश रेखलाल चौधरी (३०) व सोमेश चिंतामन बागडे (३४) असे त्यांचे नाव असल्याचे पुढे आले. त्यांनी ती मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली. सोबतच नागपूर व गोंदिया येथून आणखी दोन मोटारसायकल चोरल्याची कबुली त्यांनी दिली.
रेल्वे स्टेशन वरून मोटारसायकल चोरून ते दारू दुकानाजवळ ठेवत व संधी मिळताच नेत होते. चौधरी व बागडे यांनी पोलिसांच्या चमूला दारू दुकानाजवळ जाऊन त्या मोटारसायकल दाखविल्या. तेथे एमएच ३१-बीयू ७०५० व एक विना क्रमांकाची मोटारसायकल आढळली. या घटनेची तक्रार रेल्वे पोलिसांत करण्यात आली. झाडे यांनी आपल्या मोटरसायकलला ओळखले. त्यानंतर त्या दोघांची कसून चौकशी केल्यावर आणखी तीन मोटारसायकलची माहिती त्यांनी दिली. सदर मोटारसायकल दिनेश चौधरी यांच्या घरी लपवून ठेवल्या होत्या. त्या सहाही मोटारसायकलला पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले. यापूर्वीही रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी १९ मोटारसाकल जप्त केल्या होत्या.
न्यायालयातून सायकल लंपास
गोंदिया : येथील जिल्हा न्यायालयात कर्मचाºयाने नेहमीप्रमाणे आपली सायकल उभी केली असता अज्ञात आरोपी चोरून नेत असताना सीसीटिव्ही कॅमेरात आढळले. २ एप्रिलला सकाळी १०.१५ वाजतादरम्यान घडलेल्या या घटनेत पोलिसांनी भादंविच्या कलम ३७९ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.