ग्रामविकास विभागाला दोन राष्ट्रीय पुरस्कार
By Admin | Published: June 18, 2017 12:49 AM2017-06-18T00:49:55+5:302017-06-18T00:49:55+5:30
राज्यामध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत अपारंपरिक तंत्रज्ञान वापरुन ४८१ किलोमीटरची करण्यात आलेली कामे तसेच दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्यात आलेली
विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यामध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत अपारंपरिक तंत्रज्ञान वापरुन ४८१ किलोमीटरची करण्यात आलेली कामे तसेच दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्यात आलेली रस्त्यांची कामे आणि दिलेल्या रस्त्यांच्या लांबीचे उद्दिष्टही कालमर्यादेत करण्यात आल्याने देशात महाराष्ट्र राज्याला ग्रामसडक योजनेत उत्कृष्ट पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचे वितरण १९ जूनला होणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रकारांना दिली.
ग्रामीण भागातील न जोडलेली गावे, लोकवस्त्या बारमाही रस्त्यांद्वारे जोडण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अंमलात आणली असून ग्राम विकास विभागांतर्गत रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत २४ हजार ४२७ किलोमीटर लांबीची कामे मंजूर झाली असून यापैकी मे २०१७ पर्यंत २३ हजार ३३९ किलोमीटरचे रस्ते पूर्ण झालेले आहेत.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गोंदिया जिल्ह्याला पुरस्कार देण्यात येणार आहे. विजय सूर्यवंशी हे जिल्हाधिकारी असताना जिल्ह्याने ही कामगिरी केली.