दोन नक्षल कमांडरला अटक
By admin | Published: September 28, 2014 01:00 AM2014-09-28T01:00:54+5:302014-09-28T01:00:54+5:30
महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर विशेष अभियान राबवून गडचिरोली पोलिसांनी दोन मोठ्या नक्षलवाद्यांना शनिवारी अटक केली. उल्लेखनीय म्हणजे अटक झालेले शामलाल ऊर्फ कमलेश रूपसिंग गावडे याच्यावर
गडचिरोली पोलिसांची कामगिरी : नक्षलवाद्यांना हादरा
गडचिरोली : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर विशेष अभियान राबवून गडचिरोली पोलिसांनी दोन मोठ्या नक्षलवाद्यांना शनिवारी अटक केली. उल्लेखनीय म्हणजे अटक झालेले शामलाल ऊर्फ कमलेश रूपसिंग गावडे याच्यावर १२ लाखांचे तर जितेश्वरी ऊर्फ माहेश्वरी इंद्रजी मडावी हिच्यावर दोन लाखांचे बक्षीस होते.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील धानोरा उपविभागात गडचिरोली जिल्हा पोलिसांनी नक्षल विरोधी अभियान राबविण्यास सुरूवात केली आहे. या अभियानादरम्यान तुकूम-मर्केगाव जंगल परिसरात जहाल नक्षलवादी शामलाल ऊर्फ कमलेश रूपसिंग गावडे (२७) रा. मुंजल ता. मानपूर जि. राजनांदगाव (छत्तीसगड) याला अटक करण्यात आली. शामलाल हा जहाल नक्षलवादी असून तो मदनवाडा दलम कमांडर आहे व जितेश्वरी ऊर्फ माहेश्वरी इंद्रजी मडावी (२०) रा. अंबाटोला ता. मानपूर जि. राजनांदगाव (छत्तीसगड) हिलाही अटक करण्यात आली आहे. ती औंधी दलम सदस्य आहे. शामलाल व जितेश्वरी या दोन नक्षलवाद्यांच्या विरोधात धानोरा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०७, ३५३, १४७, १४३, १४८, १४९, १२०, भारतीय हत्यार कायदा ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. धानोरा न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी दिली आहे. महाराष्ट्र-छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागात हे दोघेही कार्यरत होते. त्यांच्यावर दोन्ही राज्यात १० ते १२ गंभीर नक्षली गुन्हे आहेत. यापूर्वीही पोलिसांनी औंधी दलमच्या नक्षल कमांडरला अटक केली आहे. वर्षभरात एकूण १७ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)