‘कृष्णा’वर दोन उपाध्यक्ष पदांची नवी खेळी
By admin | Published: September 11, 2015 11:11 PM2015-09-11T23:11:43+5:302015-09-11T23:38:59+5:30
जगदीश जगताप यांना संधी : नाराजी दूर करण्यासाठी भोसले पिता-पुत्रांची संकल्पना
अशोक पाटील ---इस्लामपूर --कऱ्हाड, वाळवा आणि कडेगाव तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्ष पदावर दोन संचालकांना संधी देण्याबाबत डॉ. सुरेश व अतुल भोसले या पिता—पुत्रांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. संचालक जगदीश जगताप यांची नाराजी दूर करुन कऱ्हाड दक्षिणमधील भोसले गटाची ताकद वाढविण्यासाठी ही खेळी खेळली जात आहे. २६ सप्टेंबररोजी सर्वसाधारण सभेत या निवडीवर शिक्कामोर्तब होणार असल्याचे समजते.कृष्णा कारखान्याच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीवेळी जगताप यांनाच उपाध्यक्षपद मिळणार, या अपेक्षेने त्यांचे समर्थक जल्लोषाच्या तयारीत आले होते. परंतु ऐनवेळी वाळवा तालुक्यातील तांबव्याचे लिंबाजी पाटील यांचे नाव पुढे आले. त्यामुळे जगताप व त्यांचे कार्यकर्ते नाराज झाले. या नाराजीतून त्यांनी सभात्याग केला होता. या निवडीनंतर वरचेवर त्यांची नाराजी स्पष्ट झाली होती. ती दूर करण्यासाठीच भोसले पिता—पुत्रांनी कारखान्यावर दोन उपाध्यक्ष करण्याची संकल्पना पुढे आणली आहे. त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. जगदीश जगताप पूर्वाश्रमीचे मदन मोहिते, डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या गटाचे आहेत. ते सलग १५ वर्षे संचालक होते. मागील वेळी त्यांना निवडणूक लढविता आली नव्हती. यावेळी मात्र त्यांनी इंद्रजित मोहिते यांना रामराम ठोकत भोसले गटाशी हातमिळवणी केली होती. या तहावेळी, उपाध्यक्षपद तुम्हालाच देऊ, असे आश्वासन त्यांना मिळाले होते, परंतु वाळव्यातील संचालकांची संख्या पाहता, डॉ. भोसले यांनी ऐनवेळी या तालुक्याला उपाध्यक्षपद दिले. यामुळे जगताप व त्यांचे कार्यकर्ते नाराज झाले. ही नाराजी डॉ. भोसले दूर करण्याच्या प्रयत्नात आहेत.
सध्या कृष्णा कारखाना आर्थिक संकटात आहे. माजी अध्यक्ष मदनराव मोहिते, डॉ. इंद्रजित मोहिते आणि अविनाश मोहिते यांच्या कारकीर्दीत भरती केलेल्या कामगारांचे सर्वेक्षण केले जात आहे. जो कामगार भोसले गटाचा आहे, त्याला न्याय देण्याचे धोरण राबविले जात आहे. इतर गटाच्या कामगारांना कमी करण्यात आले आहे. ही कमी केलेली संख्या दीड हजाराच्या घरात आहे. सध्या कामावर असलेल्या आणि कमी केलेल्या कामगारांचे पगार देणे हे नवीन संचालक मंडळापुढे आव्हान ठरले आहे. कऱ्हाड, वाळवा आणि कडेगाव तालुक्यांसह कारखान्याच्या सभसदांचे याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.
दहा कोटीपर्यंत ठेवी संकलित
साखर कारखान्यापुढचे आव्हान, त्यातच कामगारांचे थकलेले पगार, निवडणुकीत दिलेले मोफत साखरेचे आश्वासन आदी संकटांना तोंड देण्यासाठी भोसले पिता-पुत्रांनी कार्यक्षेत्रात असलेल्या सर्वच स्थानिक सहकारी संस्थांकडून कारखान्यासाठी ठेवी गोळा करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत दहा कोटींच्या आसपास रक्कम गोळा झाल्याचे समजते.
कृष्णा कारखाना कऱ्हाड दक्षिण मतदारसंघात येतो. यापूर्वी कारखान्याच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपद निवडीवेळी कधीही वाद झाले नव्हते. यावेळी कऱ्हाड तालुक्यालाच उपाध्यक्ष पदाची संधी मिळणार होती. परंतु ऐनवेळी ही संधी वाळव्याला देण्यात आली. उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी माझ्या नावाची चर्चा असली तरी, याबाबत मला माहिती नाही. संधी दिल्यास भोसले गट व कारखान्याला ताकद देऊ.
- जगदीश जगताप,
संचालक, वडगाव हवेली.
सध्या कारखान्याची आर्थिक स्थिती बिकट आहे. हंगाम चालविण्यासाठी नवीन संचालकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. यासाठी अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले आणि डॉ. अतुल भोसले यांचे प्रयत्न सुरू आहेत. कारखाना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वच संचालक एकदिलाने काम करतील. दोन उपाध्यक्ष झाले तरी, कोणताही वाद होणार नाही.
- जितेंद्र पाटील,
संचालक, बोरगाव.