कोर्टाच्या आदेशाचा भंग केल्याचे दोन गुन्हे

By admin | Published: August 27, 2016 04:06 AM2016-08-27T04:06:18+5:302016-08-27T04:06:18+5:30

थरांचे उचं उंच मनोरे रचत वसई विरार परिसरात दहीहंडी उत्सव अगदी उत्साहाने साजरा करण्यात आला.

Two offenses of court order violation | कोर्टाच्या आदेशाचा भंग केल्याचे दोन गुन्हे

कोर्टाच्या आदेशाचा भंग केल्याचे दोन गुन्हे

Next

शशी करपे,

वसई- सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करीत थरांचे उचं उंच मनोरे रचत वसई विरार परिसरात दहीहंडी उत्सव अगदी उत्साहाने साजरा करण्यात आला. शहरातील अनेक मुख्य रस्ते अडवून टाकण्यात आलेले मोठे मंडप, डीजेने मर्यादेच्या बाहेर काढलेले आवाज, बालगोविंदांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतानाही वसई विरार परिसरात सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे अवघे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडी उत्सवावर घातलेले निर्बंध झुगारून वसई विरार शहरात अनेक ठिकाणी उत्सव साजरे झाले. मात्र केवळ नालासोपारा शहरात नियमांचें उल्लंघन केल्याप्ररकरणी दोन प्रकरणात पाच मंडळांच्या अध्यक्षांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
वसई विरार शहरात एकूण १२१४ छोट्या आणि घरगुती दहीहंड्या तर १५० सार्वजनिक दहीहंड्या फोडण्यात आल्या. त्यासाठी मुंबई आणि ठाणे परिसरातून मिळून तब्बल दोनशेहून अधिक गोविंदा पथकांनी भाग घेतला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करावे अशा सूचना यापूर्वीच पोलिसांना मंडळांना बजावल्या होत्या तसेच अनेक मंडळांना नोटिसाही बजावल्या होत्या. मात्र गुरूवारी अनेक ठिकाणी दहीहंड्यांच्या उत्सवात या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. वसई विरार परिसरात सहा ते सात थर लावले गेले. अनेक ठिकाणी वरच्या थरावर अगदी लहान गोविंदांचा वापर करण्यात आला होता.
तर गोविंदा पथकांमध्ये नेहमीप्रमाणे बालगोविंदांची संख्या लक्षणिय होती. विरारमधील पूर्वेकडील सर्वच मुख्य रस्त्यांवर मोठे मंंडप टाकून वाहतूक अडवण्यात आली होती. डीजेच्या आवाजाने तर सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. गोविंदांचा हा थरार पाहण्यासाठी लोकांंची अलोट गर्दी उसळली होती.
वसई विरार परिसरात कायद्या धाब्यावर वसून दहीहंडी उत्सवाचा थरार पार पडला असतानाही फक्त नालासोपाऱ्यातील तुळींज पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले. या दोन प्रकरणात पाच मंडळांच्या अध्यक्षांवर नियमांचें उल्लघंन करणे, जीव धोक्यात घालणे आदींबाबत भारतीय दंडविधान संहितेच्या कलम २३३६, १८८ मुंबई पोलीस अधिनियम १४० प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात निळेमोरे येथील शिवप्रेरणा लोढा पार्क सार्वजिनक मंडळाचे अध्यक्ष सुनिल खोत, शिवाजी मार्ग गोविंदा मंडळाचे अध्यक्ष चेतन पाटील, नालासोपार उत्सव मंडळाचे अध्यक्ष हरिश्चंद्र सुर्वे, माखनचोर मित्र गोविंदा पथकाचे अध्यक्ष रेशम भगत आणि शिवपार्वती गोविंदा मित्र मंडळाचे अध्यक्ष अरविंद मोरे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आगाशी येथे बाल गोपाळ मित्र मंडळाने दहीहंडी उत्सव पारंपारीक पद्धतीने साजरा केला. बक्षिसाचा किंवा देणगीच्या रूपाने निधी गोळा होतो त्याचा वापर मंडळ सामाजिक कार्यासाठी करीत असते. गेल्यावर्षी अभिनेता नाना पाटेकर यांच्या ’नाम फाउंडेशनला’ ५१ हजाराचा धनादेश गरीब शेतकऱ्यांना मदत म्हणून दिला गेला होता. आगाशी व चाळपेठ नाक्यावर सुरक्षिततेसाठी सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी ७५ हजार रूपये खर्च करण्यात आला.
तसेच आगाशी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रूग्णांना शुध्द पिण्याच्या पाण्यासाठी २० हजार रूपये खर्च करुन ३० लिटर क्षमतेचा वॉटर फिल्टर बसवून दिलेला आहे. यंदाही जमा झालेला निधी समाज उपयोगी कामासाठी करण्यात येणार आहे.
नगरसेवक प्रशांत राऊत यांच्या मनवेलपाडा येथील श्रीकृष्ण जन्मोत्सव दहीहंडी उत्सवात मात्र कोर्टाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्यात आले. याठिकाणी तब्बल दीडशे गोविंदा पथकांनी हजेरी लावली होती. मात्र, फक्त चार थर लावले जात असताना १८ वर्षांखालील गोविंदांना थरामध्ये सहभागी करण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. आगाशी पाटील आळी मित्र मंडळाने ४० व्या वर्षीही पारंपारिक दहीहंडी फोडण्याची परंपरा राखली होती.

Web Title: Two offenses of court order violation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.