राष्ट्रवादीत दोन मतप्रवाह

By admin | Published: August 12, 2014 02:22 AM2014-08-12T02:22:19+5:302014-08-12T02:22:19+5:30

आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभेच्या २८८पैकी १४४पेक्षा एकही जागा कमी मिळता कामा नये,

Two opinion polls in NCP | राष्ट्रवादीत दोन मतप्रवाह

राष्ट्रवादीत दोन मतप्रवाह

Next

मुंबई : आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभेच्या २८८पैकी १४४पेक्षा एकही जागा कमी मिळता कामा नये, अशी आग्रही भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली असली तरी याच आकड्याचा हट्ट न धरता लवकर आघाडी करण्यावर भर द्या, असे मत काही ज्येष्ठ मंत्र्यांनी व्यक्त केल्याचे समजते.
सूत्रांनी सांगितले की, अजित पवार यांची नजर मुख्यमंत्रिपदावर आहे आणि १४४ जागा लढविल्यास ‘मिशन मुख्यमंत्री’ सोपे होईल, असे त्यांना वाटते. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी जास्त वेळ मिळावा म्हणून जागावाटपाचा फॉर्म्युला तातडीने ठरवावा. कोणाला किती आणि कोणत्या जागा मिळतील, हे नक्की करावे असे पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ मंत्र्यांना वाटते. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर काही जणांनी तशी भावनाही व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.
जागावाटपाबाबत आघाडीतील वाद चिघळले तर त्याचा फटका निवडणुकीमध्ये बसेल, असे मानणारा एक वर्ग राष्ट्रवादीमध्ये आहे.
काँग्रेसने कधीही न जिंकलेल्या वा फारतर एखादवेळी जिंकलेल्या जागा राष्ट्रवादीच्या माथी मारल्या जात असतील तर त्या घेऊन १४४ जागांचा आकडा गाठण्याबाबतही पक्षात मतभेद असल्याचे म्हटले जाते. २००९मध्ये राष्ट्रवादीने ११४ तर काँग्रेसने १७४ जागा लढविल्या होत्या. राष्ट्रवादीला १० जागा वाढवून देण्याची तयारी काँग्रेसने यापूर्वीच दाखविली आहे. याचा अर्थ १२४-१६४ असा फॉर्म्युला मान्य करण्याची काँग्रेसची तयारी आहे. त्यात आणखी आठ-दहा जागा पदरी पाडून घ्याव्यात आणि जागावाटपाचा तिढा लवकरात लवकर सोडवावा की १४४ जागांसाठी ताणून धरावे यावरून राष्ट्रवादीतच मतभेद दिसून येत आहेत. तुटेपर्यंत ताणू नका, असा सल्ला पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिलेला होता; पण त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Two opinion polls in NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.