म्हैसाळ भ्रूण हत्याकांडातील आणखी दोन एजंटांना अटक
By admin | Published: March 13, 2017 11:06 AM2017-03-13T11:06:15+5:302017-03-13T11:13:52+5:30
भ्रूण हत्याकांडप्रकरणी डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्या आणखी दोन एजंटांना पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा अटक केली
ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 13 - संपूर्ण राज्यभर गाजत असलेल्या म्हैसाळ (ता. मिरज) येथील भ्रूण हत्याकांडप्रकरणी डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्या आणखी दोन एजंटांना पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा अटक केली. संदीप विलास जाधव (वय ३२, रा. शिरढोण, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) आणि वीरगोंडा ऊर्फ बंडू रावसाहेब गोमटे (३९, कागवाड, ता. अथणी, जि. बेळगाव) अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणात आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.
म्हैसाळ येथील डॉ. खिद्रापुरे याच्या रुग्णालयात मणेराजुरी (ता. तासगाव) येथील स्वाती जमदाडे या विवाहितेचा अनैसर्गिक गर्भपात करताना मृत्यू झाला होता. त्यानंतर म्हैसाळ परिसरात पुरलेले १९ रुग्ण सापडले होते. भ्रूण हत्याकांडाचे हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली.
या प्रकरणातील खिद्रापुरेसह दोन डॉक्टर, परिचारिका, औषध पुरवठादार, दोन एजंट असे सात जण पोलीस कोठडीत आहेत. रविवारी रात्री जाधव आणि गोमटे या आणखी दोघा एजंटांना पोलिसांनी शिरढोण आणि कागवाड येथून अटक केली. त्यांनीही डॉ. खिद्रापुरेकडे गर्भपातासाठी रुग्ण आणल्याची कबुली दिली आहे.
(म्हैसाळ भ्रूणहत्याकांड; चौकशी अधिकारी बदलला)
शिवाय कर्नाटकातील शेडबाळ येथील एका महिला डॉक्टरला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. खिद्रापुरे याच्या रुग्णालयात सांगली, मिरजेतील काही डॉक्टरांनी रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. या गैरकृत्यात सहभागी असलेल्यांपैकी कागवाड येथील डॉ. श्रीहरी घोडके हा रुग्णांची गर्भलिंग चाचणी करून शेडबाळ येथील महिला डॉक्टरकडे गर्भपात करीत असल्याचे समोर आल्याने संबंधित महिला डॉक्टरला ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे. खिद्रापुरे याची पत्नी डॉ. मनीषा हिच्या चौकशीतून सांगली, मिरजेतील काही डॉक्टर शस्त्रक्रियेसाठी म्हैसाळला येत असल्याची माहिती मिळाली आहे.
अटकेतील आरोपींच्या चौकशीत कर्नाटकात गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरांकडून महिलांची तपासणी करून खिद्रापुरे हा गेली आठ वर्षे भ्रूूणहत्या करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे.