शोरूमला लागलेल्या आगीत दोन ठार

By Admin | Published: April 24, 2017 03:34 AM2017-04-24T03:34:24+5:302017-04-24T03:34:24+5:30

खारघरमधील कोपरा गावाजवळ आदित्य प्लॅनेट या इमारतीमधील एक्सल आॅटोविस्टा या कारच्या शोरूमला रविवारी पहाटे ४ च्या सुमारास आग लागली.

Two people were killed in the fire | शोरूमला लागलेल्या आगीत दोन ठार

शोरूमला लागलेल्या आगीत दोन ठार

googlenewsNext

पनवेल : खारघरमधील कोपरा गावाजवळ आदित्य प्लॅनेट या इमारतीमधील एक्सल आॅटोविस्टा या कारच्या शोरूमला रविवारी पहाटे ४ च्या सुमारास आग लागली. या आगीत शोरूमचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून, शोरूममध्ये झोपलेल्या दोन कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. कृष्णा कुमार आणि जितेंद्र कुमार अशी त्यांची नावे आहेत. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
सायन-पनवेल महामार्गावर आदित्य प्लॅनेट या बारा मजली रहिवासी इमारतीच्या तळमजल्यावर आठ गाळ्यांत हे शोरूम आहे. आग पहाटे ४ च्या सुमारास लागली असल्याचे बोलले जाते. आगीत ५ नवीन आणि ६ नेहमीच्या वापरातील गाड्या जळून खाक झाल्या. यासह शोरूममधील फर्निचर, महत्त्वाच्या कागदपत्रांसह इलेक्ट्रॉनिक वस्तू जळल्या. अग्निशमन दलाला पहाटे ४ वाजता माहिती मिळताच खारघर अग्निशमन दलासह नवी मुंबई महापालिका, तळोजा औद्योगिक वसाहत या ठिकाणच्या अग्निशमन दलाचे १० बंब घटनास्थळी दाखल झाले. तब्बल चार तासांनी सकाळी आठच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यास अग्निशमन दलाच्या पथकांना यश आले. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले.
दरम्यान, भीषण आगीचा धोका लक्षात घेता, इमारतीमधील सर्व रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या ठिकाणी ६० फ्लॅटधारक आहेत. सुदैवाने आग वर न पसरल्याने मोठी जीवितहानी टळली. शोरूमसमोर मोठ्या प्रमाणात अनधिकृत पार्किंग असल्याने अग्निशमन बंबांना आग विझविण्यास अडथळा निर्माण झाला होता. ही आग नेमकी कशामुळे लागली, त्याला जबाबदार कोण? या संदर्भात कोणी हलगर्जी केली? याची चौकशी सुरू असल्याची माहिती खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप काळे यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Two people were killed in the fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.