आधारवाडी कारागृहातून दोन कैदी पळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 05:37 AM2017-07-24T05:37:27+5:302017-07-24T05:37:27+5:30
आधारवाडी कारागृहातून दोन कैदी रविवारी पहाटे पळून गेले. त्यांना पळताना पाहून, तुरुंग पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंधाराचा
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : आधारवाडी कारागृहातून दोन कैदी रविवारी पहाटे पळून गेले. त्यांना पळताना पाहून, तुरुंग पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंधाराचा फायदा घेत ते पसार झाले. मणिशंकर नाडर आणि डेव्हिड देवेंद्रन अशी त्यांची नावे आहेत. या घटनेमुळे आधारवाडी कारागृहाच्या भोंगळ कारभार समोर आला आहे. कैदी पाळाल्याची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
पळून गेलेल्यांपैकी नाडरला कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी अटक केली होती, तर डेव्हिडला मुंब्रा पोलिसांनी अटक केली होती. या दोघांच्या विरोधात दरोडे, चोरी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्यांना वर्षभरापूर्वी अटक केली होती. त्यांना न्यायालयाने जामीन नाकारल्याने त्यांची रवानगी आधारवाडी कारागृहात करण्यात आली होती.
या दोघांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वायर तोडून तिच्या आधारे कारागृहाच्या भिंतीवर चढून तेथून उड्या मारून पळ काढला. कारागृहातील पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ काही ठिकाणी नाकाबंदी सुरू केली; पण हे दोघे अद्याप सापडलेले नाहीत.
कैद्यांचे पलायन सीसीटीव्हीत कैद
आधारवाडी कारागृहातून कैदी पाळाल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पसार झालेल्या दोघांवर पन्नासपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. ते सराईत गुन्हेगार असल्यानेच त्यांना जामीन मिळाला नव्हता. त्यांच्यावरील खटले प्रलंबित असल्याने, कच्चे कैदी म्हणून ते तुरुंगात होते. त्या दोघांनी पळून जाण्यासाठी कारागृहातील बंद असलेल्या सीसीटीव्हीची वायर कापली. तिचा दोरीसारखा वापर करून कारागृहाच्या भिंती ओलांडल्या.
कारागृहाचे दैनंदिन कामकाज सकाळी सुरू झाले, तेव्हा दोघेही पाच नंबरच्या बराकीत होते. प्रसाधनगृहात जाण्याचा बहाणा करत, दोघे बाहेर पडल्याचे काही कैद्यांनी पाहिले होते. ते बराच काळ सापडत नसल्याने,
तुरु ंग पोलिसांनी आधी बराकीत शोध घेतला. तोवर त्यांनी भिंतीवरून उड्या मारल्या होत्या. नंतर ते कल्याण-भिवंडी मार्गावरील सरवली एमआयडीसीच्या दिशेने पळाले. या मार्गावरून जाणाऱ्या दुचाकीस्वाराला त्यांनी अडविले. तो मोबाइवर बोलत होता. त्याचा मोबाइल हिसकावून ते त्याची दुचाकी घेऊन पळ काढण्याच्या बेतात होते, तेव्हा त्यांच्यात झटापट झाली. त्यात त्यांच्यातील एका कैद्याच्या तोंडाला मार लागला.