बनावट व्हिडीओ व्हायरल प्रकरणात दोघांची चौकशी, महाराष्ट्र सायबर सेलची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 11:07 IST2025-01-02T11:06:04+5:302025-01-02T11:07:03+5:30
या बनावट व्हिडीओमुळे फडणीस यांच्याबद्दल समाजात गैरसमज निर्माण होऊ शकतो, समाजातील एका गटाच्या भावना दुखावू शकतात आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशा आशयाची तक्रार भाजपने सायबर महाराष्ट्रकडे केली.

बनावट व्हिडीओ व्हायरल प्रकरणात दोघांची चौकशी, महाराष्ट्र सायबर सेलची माहिती
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांपैकी दोघांची ओळख पटविण्यात महाराष्ट्र सायबर विभागाला यश आले आहे. त्यानुसार चौकशी सुरू असल्याचे महाराष्ट्र सायबर सेलने बुधवारी सांगितले.
या बनावट व्हिडीओमुळे फडणीस यांच्याबद्दल समाजात गैरसमज निर्माण होऊ शकतो, समाजातील एका गटाच्या भावना दुखावू शकतात आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशा आशयाची तक्रार भाजपने सायबर महाराष्ट्रकडे केली. याप्रकरणी सायबर महाराष्ट्रने हा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या १२ समाजमाध्यम खातेधारकांवर गेल्या आठवड्यात मंगळवारी गुन्हा दाखल केला होता. व्हिडीओ तयार करणारी व्यक्ती आणि तो पसरविणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे.
तपासादरम्यान वरळी येथे राहणाऱ्या वरद कांकी या व्यक्तीकडे चौकशी करण्यात आली. त्यांचा जप्त केलेल्या मोबाइलमध्ये फडणवीस यांचा तयार केलेला व्हिडीओ आढळला. मात्र, तो एका व्हॉट्सॲप समूहावरून आपल्याकडे आल्याचे वरद यांचा दावा होता. प्राथमिक चौकशीत या दाव्यात तथ्य असल्याचे सायबर महाराष्ट्रने सांगितले. अधिक तपासात पद्माकर अंबोलकर या व्यक्तीने सर्वप्रथम हा व्हिडीओ ग्रुपवर शेअर केल्याची माहिती पुढे आली. त्याआधारे अंबोलकर यांना नोटीस बजावत चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.