पहिल्या पावसाचे दोन बळी
By admin | Published: June 15, 2015 02:45 AM2015-06-15T02:45:39+5:302015-06-15T02:45:39+5:30
मान्सूनच्या पावसामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला असला तरी दुसरीकडे मुसळधार सरींचे निमित्त होत मुंबईतील दोघांचा बळी गेला आहे.
मुंबई : मान्सूनच्या पावसामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला असला तरी दुसरीकडे मुसळधार सरींचे निमित्त होत मुंबईतील दोघांचा बळी गेला आहे. पहिल्या घटनेत पवईत उद्यानातील आसन व्यवस्थेचे छत कोसळून एक जण ठार झाला. तर दुसऱ्या घटनेत घाटकोपरमध्ये घराच्या छतावरून पडून एका व्यक्तीचा बळी गेला.
पवई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथील आसन व्यवस्थेचे छत कोसळल्याची घटना शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. या छताखाली मद्यप्राशन करीत बसलेल्या तिघांपैकी एक जण अडकल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचल्या आणि छताखाली अडकलेल्या सहदेव नाईक (४५) यांना बाहेर काढले, मात्र तोपर्यंत त्यांचा मत्यू झाला होता.
दुसऱ्या घटनेत घाटकोपरमधील चिरागनगर परिसरात घराच्या छतावर ताडपत्री टाकत असताना पडून एकाचा बळी गेला. कमल पांडे (४०) असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते रिक्षाचालक होते. पाणी घरात झिरपू नये, म्हणून दुपारी दोनच्या सुमारास ते घरावर ताडपत्री टाकण्यासाठी चढले होते. ताडपत्री टाकून खाली उतरत असताना अंदाजे १५ ते १७ फुटांवरून ते खाली कोसळले. यात त्यांच्या डोक्याला मार बसला. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)