अकोल्यातील दोन शिवभक्तांचा नर्मदा नदीत बुडून मृत्यू!
By admin | Published: August 24, 2016 12:20 AM2016-08-24T00:20:22+5:302016-08-24T00:20:22+5:30
तोष्णीवाल ले-आउट, भाटियावाडी येथील रहिवासी युवकांचा समावेश.
अकोला, दि. २३: शहरातील सवरेपचार रुग्णालयासमोर असलेल्या राधाकिसन प्लॉटमधील भाटियावाडी येथील रहिवासी तसेच कुल्फी विक्रेता आणि तोष्णीवाल ले-आउट परिसरातील पिंपळेनगर येथील रहिवासी दोन युवकांचा मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर येथे नर्मदा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. योगेश पाठक आणि संजय जोशी असे या मृतकांची नावे असून यामधील एकाचा मृतदेह आढळल्याची माहिती आहे.
मध्यप्रदेशातील उज्जैन आणि ओंकारेश्वर येथे श्रावण महिन्यात महादेवाच्या दर्शनासाठी शिवभक्तांची मोठी गर्दी होते. महादेवाच्या दर्शनाला अकोल्यातील युवकांसह महिलाही मोठय़ा प्रमाणात ओंकारेश्वर येथे दाखल होतात. श्रावण महिन्यातील तिसर्या सोमवारी दर्शनासाठी शहरातील तोष्णीवाल ले-आउट आणि राधाकिसन प्लॉट येथील तब्बल १८ युवकांची चमू दर्शनासाठी शनिवारी रात्री अकोल्यातून रवाना झाली होती. रविवारचा मुक्काम ठोकल्यानंतर या युवकांनी सोमवारी दर्शन घेतले. त्यानंतर या चमूतील १५ ते १६ युवक परतले; मात्र संजय जोशी आणि योगेश पाठक यांना आणखी काही मित्र त्या ठिकाणी भेटल्याने ते सोमवारी ओंकारेश्वर येथे मुक्कामी राहिले. मंगळवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास संजय जोशी त्यांचा मोठा भाऊ बंटी जोशी आणि योगेश पाठक हे तिघे नर्मदा नदीत नावेमधून प्रवास करीत असताना एकाने नदीतील पाणी काढण्याचा प्रयत्न केला. यातच छोटी असलेली नाव पाण्यात एका भागावर गेल्याने संजय जोशी आणि योगेश पाठक नर्मदा नदीच्या प्रवाहात वाहून गेले. यामध्ये दोघांचाही मृत्यू झाल्याची माहिती असून आपत्कालीन पथक त्यांचा शोध घेत आहे. एका युवकाचा मृतदेह मिळाल्याची माहिती प्राप्त झाली असली तरी प्रशासकीय सूत्रांकडून मात्र अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
एकाचा मृतदेह आढळला
योगेश पाठक आणि संजय जोशी हे दोघे नर्मदा नदीच्या पुरात वाहून गेल्यानंतर त्यांना शोधण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले. दुपारी २ वाजताच्या सुमारास यामधील एका युवकाचा मृतदेह मिळाल्याची माहिती आहे; मात्र अधिकृत दुजोरा प्रशासनाकडून देण्यात आलेला नाही. तर दुसर्या युवकाचा शोध सुरूच असून मंगळवारी सायंकाळपर्यंत दुसर्या युवकाचा पत्ता लागलेला नव्हता.
आ. शर्मांचा थेट मुख्यमंत्रांना फोन
आ. गोवर्धन शर्मा यांना अकोल्यातील दोन युवक बुडाल्याची माहिती मिळताच त्यांनी थेट मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. त्यानंतर सदर युवकांसंदर्भात माहिती घेतली. दोन्ही कुटुंबातील महत्त्वाच्या व्यक्तींना माहिती दिली. त्यानंतर ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला त्या ठाणेदारांनाही या प्रकाराची माहिती आ. शर्मा यांनी दिली.
शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानचे मंदिर ओंकारेश्वर येथे आहे. या ठिकाणी भक्तनिवासाची व्यवस्था असून अकोल्यातील युवक याच भक्तनिवासात मुक्कामी होते. घडलेला प्रकार संस्थांनच्या विश्वस्थांना माहिती पडताच ओंकारेश्वर येथील संस्थानच्या पदाधिकारी आणि कर्मचार्यांनी युवकाच्या शोधासाठी प्रयत्न सुरू केले.