टेंभू येथे एकाच साडीने दोघींचा गळफास !
By admin | Published: April 3, 2016 03:50 AM2016-04-03T03:50:18+5:302016-04-03T03:50:18+5:30
एकाच झाडाला आणि एकाच साडीने गळफास घेऊन महिलेसह मुलीने आत्महत्या केली. कऱ्हाड शहरानजीक टेंभू गावामध्ये शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना उघडकीस
कऱ्हाड (जि. सातारा) : एकाच झाडाला आणि एकाच साडीने गळफास घेऊन महिलेसह मुलीने आत्महत्या केली. कऱ्हाड शहरानजीक टेंभू गावामध्ये शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. संबंधित महिला व मुलीची ओळख रात्री उशिरापर्यंत पटली नव्हती. मात्र, घटनास्थळी आढळलेल्या पुराव्यांवरून त्या दोघी सातारा परिसरातील असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
कऱ्हाडपासून सुमारे पाच किलोमीटरवर टेंभू गाव असून, ओगलेवाडीतील रेल्वे स्टेशनपासून या गावाकडे जाण्यासाठी रस्ता आहे. या रस्त्यानजीकच ‘मुळूकाचा बिघा’ नावाचे शिवार आहे. या शिवारात नेहमीच शेतकऱ्यांची वर्दळ असते. शनिवारी सकाळीही काही ग्रामस्थ या शिवारात गेले होते. त्यावेळी भोकरीच्या झाडाला एक महिला व मुलीचा मृतदेह लटकत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
घटनास्थळी पोलिसांना एक पर्स आढळून आली. त्यामध्ये मोबाईलचा चार्जर व एसटीचे तिकीट सापडले. संबंधित तिकीट ३१ मार्च रोजीचे सातारा ते कऱ्हाड प्रवासाचे व दोन प्रवाशांचे आहे. त्यामुळे ते तिकीट संबंधित महिला व मुलीचेच असण्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पर्समध्ये पोलिसांना चार्जर आढळला. मात्र, मोबाईल आढळला नाही. त्यामुळे महिला व मुलीची ओळख पटविण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत. या पर्ससोबतच एक प्रवासी बॅग असून, त्या बॅगेमध्ये मुलीचे कपडे व काही साड्या आहेत. त्याव्यतिरिक्त ओळख पटण्यासारखा कोणताही पुरावा पर्स अथवा बॅगेमध्ये पोलिसांना आढळून आला नाही. (प्रतिनिधी)