दोन बहिणीसह भावाचा तलावात बुडून मृत्यू, कमळाचे फुल तोडण्याकरिता उतरले होते तलावात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2017 09:14 PM2017-09-03T21:14:59+5:302017-09-03T21:15:10+5:30
गावाशेजारील तलावात कमळाचे फुल व कळया तोडण्याकरिता तलावात शिरलेल्या दोन बहिणींसह भावाचा बुडून करूण अंत झाला.
भंडारा : गावाशेजारील तलावात कमळाचे फुल व कळया तोडण्याकरिता तलावात शिरलेल्या दोन बहिणींसह भावाचा बुडून करूण अंत झाला. ही हृदयद्रावक घटना रविवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास तुमसर तालुक्यातील आदिवासी बहुल गाव असलेल्या सुंदरटोला येथे घडली. मुस्कान धनराज सरीयाम (९), प्रणय धनराज सरीयाम (१०) व सारिका छबीलाल सरीयाम (११) अशी या मृत पावलेल्या बालकांची नावे आहेत. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
सुंदरटोला येथील रहिवासी असलेली ही तिघेही भाऊ-बहीण गावाजवळील तलावात कमळाचे फुल व कळी (डोडे) तोडण्याकरिता पाण्यात उतरले. तत्पूर्वी त्यांनी कपडे ओले होऊ नये म्हणून, तलावाच्या पाळीवर कपडे काढून ठेवले होते. तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने त्या तिघांचाही बुडून मृत्यू झाला.
तलावाच्या काठावर कपडे दिसल्याने इतरांना शंका उत्पन्न झाली. काहींना तिघेही भाऊ-बहिण तलावाच्या दिशेने काही वेळापूर्वी जाताना बघितले होते. ही वार्ता गावात वाºयासारखी पसरली. तलावात शोधाशोध सुरु होती. रात्र झाल्याने त्यात अडचणी निर्माण होत्या. दरम्यान ८ वाजताच्या सुमारास तिघांचे मृतदेह तलावाबाहेर काढण्यात आले असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तुमसर उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले.
मृत पावलेल्या बालकांच्या कुटुंबियाला शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी चिखला येथील सरपंच दिलीप सोनवाने, माजी जि.प. सदस्य अशोक उईके, माजी नगरसेवक लक्ष्मीकांत सलामे, माजी पं.स. सदस्य प्रभा पेंदाम व अनिल टेकाम यांनी केली आहे.