प्रेरणा स्कूलचे दोन चिमुकले बेशुद्ध
By Admin | Published: December 7, 2014 12:31 AM2014-12-07T00:31:13+5:302014-12-07T00:31:13+5:30
दोघेही चांगले मित्र. एकाच बसमध्ये वहिरगावच्या प्रेरणा पब्लिक स्कूलमध्ये जायचे. एकाच बाकावर बसायचे. शनिवारी त्यांना औषधाच्या पाच गोळ्या सापडल्या. दोघांनीही त्या ‘शेअर’ करून खाल्ल्या.
प्रेरणा स्कूलचे दोन चिमुकले बेशुद्ध
सापडलेल्या औषधाच्या गोळ्या खाल्ल्या : शिक्षकांचा बेजबाबदारपणा
नागपूर : दोघेही चांगले मित्र. एकाच बसमध्ये वहिरगावच्या प्रेरणा पब्लिक स्कूलमध्ये जायचे. एकाच बाकावर बसायचे. शनिवारी त्यांना औषधाच्या पाच गोळ्या सापडल्या. दोघांनीही त्या ‘शेअर’ करून खाल्ल्या. थोड्याच वेळात त्यांना भोवळ आली अन् ते बेशुद्ध होऊन खाली पडले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याऐवजी शाळेच्या प्राचार्य, शिक्षिकांनी त्यांच्या पालकांना बोलावले. पालक आल्यानंतर धावपळ करून त्यांनी या बालकांना वेळीच रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे आता चिमुकले बचावले. शाळेतील शिक्षिकांनी दाखविलेल्या बेजबाबदारपणाबद्दल त्यांच्या पालकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
दिव्यांश दिनेश सोनटक्के (वय साडेचार वर्षे)आणि प्रचित संजय येरणे (वय चार वर्षे ) अशी या दोन चिमुकल्यांची नावे आहेत. दिव्यांश उदयनगरला राहतो तर प्रचित भोलेनगरला. शनिवारी नेहमीप्रमाणे त्यांना घेण्यासाठी शाळेची व्हॅन आली. ते दोघेही विहिरगावच्या प्रेरणा पब्लिक स्कूलमध्ये शिकतात. आईवडिलांनीही आपल्या चिमुकल्यांना हसत निरोप दिला.
प्राचार्य, शिक्षिकांचा असंवेदनशीलपणा
शाळेत गेल्यानंतर या दोघांना कुठेतरी ‘धून ५०’ नावाच्या सीलबंद असलेल्या चार गोळ्या सापडल्या. गोळ्या पाहून दोघांनाही आनंद झाला. त्यांनी लगेच पाकिटातील सीलबंद गोळ्या बाहेर काढल्या आणि दोघेही जीवलग मित्र असल्यामुळे त्यांनी त्या आपसात वाटून खाल्ल्या. स्नेहसंमेलनासाठी शाळेत नृत्याचा सराव सुरू होता.
याच दरम्यान दोघेही बेशुद्ध होऊन खाली पडले. त्यांच्या डोळ्यापुढे अंधारी येत होती. त्यांची अवस्था पाहून त्यांना तातडीने वैद्यकीय उपचार देण्याची गरज होती. परंतु शाळेच्या प्राचार्य श्रीजल लुही यांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याऐवजी त्यांच्या पालकांना मोबाईलवरून माहिती देऊन शाळेत बोलावले. पालक चिंतातूर चेहऱ्याने शाळेत पोहोचले. तेथे व्हॅनही उपलब्ध नव्हती. पालकांनी सांगितल्यानंतर शाळेने व्हॅन बोलावली. त्यानंतर या दोन्ही चिमुकल्यांना सक्करदरा चौकातील अनमोल मॅटर्निटी व नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना सलाईन लावून नळीद्वारे त्यांच्या पोटातील पाणी काढून घेतले. त्यानंतर त्यांना २४ तास देखरेखीखाली ठेवण्याची गरज असल्याचे डॉ. राजकुमार किरतकर यांनी सांगितले. दुपारी ४.१५ वाजता हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अतुल इंगोले यांनी रुग्णालयात पोहोचून पालकांचे बयाण नोंदवून घेतले.
मुले बेशुद्ध झाल्यानंतर त्यांना धावपळ करून तातडीने रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. परंतु प्रेरणा पब्लिक स्कूलच्या प्राचार्यांनी या चिमुकल्यांच्या पालकांना मोबाईलवरून मुले बेशुद्ध झाल्याची माहिती दिली. पालकांनी तातडीने मुलांना व्हॅनमध्ये टाकले. त्यानंतर पालक त्यांना घेऊन सक्करदरा चौकातील डॉ. राजकुमार किरतकर यांच्या रुग्णालयात आले. परंतु व्हॅनचा चालक वगळता शाळेतील प्राचार्य किंवा एकाही शिक्षिकेला या चिमुकल्यांसोबत व्हॅनमध्ये बसून रुग्णालयात जावे असे वाटले नाही.
तीन तासांनी आले शुद्धीवर
सक्करदरा येथील अनमोल मॅटर्निटी व नर्सिंग होममध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी या चिमुकल्यांना सलाईन लावले. त्यानंतर नळी टाकून त्यांच्या पोटातील पाणी बाहेर काढले. तोपर्यंत ते दोघेही निपचित पडून होते. तब्बल तीन तासानंतर त्यांनी डोळे उघडले. परंतु त्यांच्या डोळ्यात गुंगी जाणवत होती. (प्रतिनिधी)