निवडणुकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह; शरद पवार यांचं मोठं विधान!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 09:32 AM2022-05-10T09:32:12+5:302022-05-10T09:32:42+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे.
कोल्हापूर-
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. निवडणुकांबाबत आमच्या पक्षात दोन मतप्रवाह असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. ते कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
"निवडणुकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह आहेत. काहींना वाटतंय की निवडणूक काँग्रेस आणि शिवसेनेला सोबत घेऊन लढावी. तर काही जणांनी एकट्यानं निवडणूक लढण्याचा आग्रह धरला आहे. यावर पक्षात सविस्तर चर्चा होऊन येत्या काळात निर्णय घेतला जाईल", असं शरद पवार म्हणाले. तसंच कोर्टानं १५ दिवसांत निवडणुका घ्या असे आदेश दिलेले नाहीत, असंही पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.
"सुप्रीम कोर्टानं १५ दिवसांत निवडणुका घ्या असं म्हटलेलं नाही. निवडणूक तयारीची प्रक्रिया १५ दिवसांत सुरू करा असं कोर्टानं सांगितलं आहे", असं शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं. देशपातळीवर मोदींना सक्षम पर्याय देण्यात अद्याप विरोधी पक्षांना यश येत नसल्याच्या प्रश्नावर बोलत असताना शरद पवार यांनी विरोधी पक्षांमधील अंतर्गत मतभेदांवर बोट ठेवलं. "मोदींना सक्षम पर्याय देण्यासंदर्भात काँग्रेससह सर्व पक्षांनी याचा अंतर्गत निर्णय घेणं महत्वाचं आहे", असं शरद पवार म्हणाले.
राज ठाकरेंना टोला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार असून यावरुन शिवसेना आणि मनसेमध्ये टीका सुरू झाली आहे असं शरद पवार यांना विचारण्यात आलं असता त्यांनी एका वाक्यात यावर उत्तर देत राज ठाकरेंचं नाव न घेता त्यांना टोला लगावला. अयोध्या दौरा हा काही राष्ट्रीय प्रश्न नाही, एवढं बोलून शरद पवार यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला टोला लगावला. "अयोध्या दौरा हा काही राष्ट्रीय प्रश्न नाही. वाढती महागाई, बेरोजगारी आणि पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती हे खरे देशाला भेडसावणारे प्रश्न आहेत. अयोध्या दौरा काय माझा नातूही काल मी पाहिलं तर अयोध्येला गेलाय. त्यात काही विशेष असं नाही", असं शरद पवार म्हणाले.