ओझरखेड धरणात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
By admin | Published: June 1, 2016 10:47 PM2016-06-01T22:47:35+5:302016-06-01T22:47:35+5:30
येथील जीआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांचा बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ओझरखेड धरणात बुडून अंत झाला. कौस्तुभ आगळे व अक्षय जगताप अशी मृतांची नावे आहेत.
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 1 - येथील जीआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांचा बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ओझरखेड धरणात बुडून अंत झाला. कौस्तुभ आगळे व अक्षय जगताप अशी मृतांची नावे आहेत.
कौस्तुभ रवींद्र आगळे (२२, रा. इंदिरानगर, नाशिक), अक्षय राजेंद्र जगताप (२३, रा. पाथर्डी फाटा, नाशिक), अजिंक्य प्रकाश सोनवणे (२४, रा. सिडको, नाशिक) व अक्षय विवेक रनाळकर (२४, रा. विनयनगर, नाशिक) असे चौघे मित्र दोन दुचाकीवरून ‘सिनेमा बघण्यासाठी जात आहोत’ असे कुटुंबियांना सांगून घरून निघाले. दरम्यानच्या काळात नाशिक-वणी रस्त्यावरून ते ओझरखेड धरण परिसरात पोहचले. त्या ठिकाणी हॉटेलमध्ये जेवण घेतल्यानंतर ओझरखेड धरणातील सप्तशृंग उपसा जलसिंचन पाणीवापर संस्थेच्या लिप्टलगत ते चौघे गेले. त्याठिकाणी अंघोळीसाठी कौस्तुभ रवींद्र आगळे व अक्षय राजेंद्र जगताप हे दोघे पाण्यात उतरले, तर अजिंक्य सोनवणे व अक्षय रनाळकर पाण्याबाहेर थांबले. पाण्यात चालत पुढे जात असताना आगळे व जगताप दोघेही गाळात अडकले. ते दृश्य पाहून त्यांच्या मित्रांनी मदतीसाठी हॉटेल परिसरातील ग्रामस्थांना आवाज दिला. काही तरुणांनी पाण्यात उड्या मारून त्या दोघांचा शोध घेतला. काही वेळाने ते दोघेही मृतावस्थेत आढळून आले.