सापाच्या विषाची तस्करी करणारे दोघे अटकेत
By admin | Published: December 27, 2016 05:17 PM2016-12-27T17:17:37+5:302016-12-27T17:17:37+5:30
एका फ्लॅटवर छापा मारून कोब्रा नाग व घोणस या अतिविषारी सापांचे विष तस्करी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली
हनुमंत देवकर/ऑनलाइन लोकमत
चाकण, दि. 27 - खराबवाडी येथील सारा सिटीत आज ( 27 ) एका फ्लॅटवर छापा मारून कोब्रा नाग व घोणस या अतिविषारी सापांचे विष तस्करी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. सर्पमित्रांच्या नावाला काळिमा फासणारी ही घटना आहे. चाकण पोलीस व वनविभागाने सर्पमित्रांच्या माहितीवरून हि कारवाई केली. फ्लॅटमध्ये ठेवलेल्या प्लास्टिक बॅरल व लाकडी पेटीतून 40 घोणस, 31 कोब्रा वनविभागाने ताब्यात घेतले असून, विष काढलेल्या तीन बाटल्या जप्त केल्या आहेत. याची किंमत बाजारभावाप्रमाणे 25 ते 30 लाख रुपये आहे. सापांचे काढलेले विष उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात पाठविण्यात येत होते. हे विष 31 डिसेंबरच्या पार्टीतील नशेसाठी किंवा सापांचे इंजेक्शन बनविण्यासाठी वापरले जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
याप्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 कलम 9 व 11 अन्वये आरोपी रणजित पंढरीनाथ खारगे ( वय 37, रा. ए 1/406, सारा सिटी, खराबवाडी, चाकण, ता.खेड, जि पुणे, मुळगाव कुंडल, ता. पलूस, जि. सांगली ) व धनाजी अभिमान बेळकुटे वय 30, रा. खराबवाडी, चाकण, मुळगाव वरकुटे मूर्ती, ता. करमाळा जि सोलापूर ) चाकण पोलीसांनी अटक केली आहे. आरोपी खारगे याला 2005 मध्ये कल्याण व सांगली जिल्यातील मिरज पोलीस ठाण्यात अशा प्रकारचा गुन्हा दाखल असून, तो सांगली जिल्ह्यातून तडीपार आहे. तसेच यातून निर्दोष सुटल्याचे तो सांगत आहे. आरोपी खारगे हा गेल्या तीन वर्षांपासून या फ्लॅट मध्ये राहत होता.
सर्पमित्र व होमगार्ड अक्षय गजानन खोपडे याला मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्याने फ्रेंड्स ऑफ नेचर असोसिएशनचे अध्यक्ष बापूसाहेब सोनवणे व पोलिसांना कळविले. आज रात्री एकच्या सुमारास पोलीस उपविभागीय अधिकारी मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक संतोष गोरी गोसावी, उपनिरीक्षक श्रीधर जगताप, महेश मुंडे, किशोर कदम, चाकण वन परिक्षेत्र अधिकारी के. एन. साबळे, वन कर्मचारी पवन आहेर, एस.एस. लवंगे, एम.एम. साबळे, प्रकाश खांडेभराड, पोलीस हवालदार संजय घाडगे, आय. जी. शेख, प्रवीण गोसावी यांनी दहा सर्पमित्रांसमवेत आज सकाळी ११ वाजता फ्लॅटवर छापा टाकला. या कारवाईत सर्पमित्र बापूसाहेब सोनवणे, अक्षय खोपडे, दत्ता घुमटकर, गणेश टिळेकर, प्रफुल्ल टंकसाळे, मनोहर शेवकरी, विशाल बारवकर, प्रवीण कुलकर्णी, गौरव डोंगरे, श्रीकांत साळुंके, सचिन भोपे या सर्पमित्रांनी करावीत सहभाग घेऊन सर्व सर्प मोजून देण्यास पोलीस व वन विभागाला मदत केली. घरातून एक २०० लिटरचा घोणस एकत्र ठेवल्याचा बॅरल, कोब्रा ठेवलेली लाकडी पेटी, विषाच्या बाटल्या, साप पकडण्याच्या स्टिक, साप ठेवण्याच्या बरण्या, विष काढण्याच्या काचेच्या नळ्या, भांडी, ३१ नाग, ३९ जिवंत घोणस व एक मृत घोणस पोलीस व वनविभागाने जप्त केले. जप्त केलेले साप जुन्नर वन विभागाच्या व्हॅनमधून नेण्यात आले.
फ्लॅटचा मालकावर होणार कारवाई
एखादा फ्लॅट किंवा खोली भाड्याने देताना भाडेकरूची माहिती न घेता फ्लॅट भाड्याने कसा दिला व हा फ्लॅट कुणाच्या नावावर आहे? भाडे करार आहे का? अशी चर्चा होती. भाडेकरू ठेवताना त्याची माहिती सदर पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक असतानाही माहिती न देता भाडेकरू ठेवल्याने फ्लॅटमालक विजया अशोक शिवले ( रा. भीमा कोरेगाव, ता. शिरूर, जि प. पुणे यांचेवर मुंबई पोलीस अधिनियम कलम १८८ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी सांगितले.
जोखीम पत्करून कुटुंबासह राहत होता
विशेष म्हणजे आरोपी रणजित खारगे हा आपली पत्नी शैलजा व दोन लहान मुलींसह या फ्लॅटमध्ये राहत होता. त्याने सोसायटीतील गेटवर सर्प मित्र म्हणून नंबर दिलेला होता, त्याने अनेक साप पकडून घरात डांबून ठेवले होते. एकदा तर त्याच्या फ्लॅटमधून एक जुळे खाली पडल्याचे नागरिकांनी सांगितले. इतके साप घरात ठेवूनही शेजारच्यांना व रखवालदाराला खबरही नाही. आरोपी धनाजी हा त्याला साप पुरवित होता, अजून किती सर्पमित्र त्याला साप पुरवित होते ते अद्याप गुलदस्त्यात आहे.
३१ डिसेंबरची तयारी ?
कोब्रा व्हेनम म्हणजे नागाचे विष याची पावडर करून दारू अथवा सरळ इंजेक्शन घेतली जाते. याला दिल्ली व गोवा राज्यात अधिक मागणी आहे. हेच भूत आता विद्यानगरी पुणे मध्ये उच्चशिक्षित तरुणांच्या मानगुटीवर बसले आहे. या पावडरला ङ-72, ङ-76 अशी नावे आहेत. हे विष अशा पाटर्यांमध्ये किंवा स्नेक बाईटचे इंजेक्शन बनविण्यासाठी पाठविण्यात येत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.